पाकिस्तानात वाजलं भारताचं राष्ट्रगीत! प्रेक्षकांनी केली आरडाओरड, मॅच दरम्यान नेमकं काय घडलं?

Champions Trophy 2025 :  जवळपास 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्याची वेळ आली. 

पुजा पवार | Updated: Feb 22, 2025, 06:16 PM IST
पाकिस्तानात वाजलं भारताचं राष्ट्रगीत! प्रेक्षकांनी केली आरडाओरड, मॅच दरम्यान नेमकं काय घडलं?
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. तब्बल 8 वर्षांनी आयसीसीने या स्पर्धेचे आयोजन केले असून यंदा ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई या दोन ठिकाणी हायब्रीड पद्धतीने खेळवली जात आहे. जवळपास 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्याची वेळ आली. त्यामुळे भारताविरुद्ध  चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी यजमान पाकिस्तानला दुबईत जावे लागणार आहे. दरम्यान पाकिस्तानात खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia VS England) सामन्यात चुकीने भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले ज्यामुळे स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला. 

नेमकं काय घडलं? 

शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना खेळवण्यात आला. यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी निवडली. सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघ मैदानात राष्ट्रगीतासाठी पोहोचले. यावेळी इंग्लंडचं राष्ट्रगीत वाजण्यापूर्वी चुकीने भारताचे राष्ट्रगीत लावले गेले. भारताचे राष्ट्रगीत वाजल्याने थोडावेळ स्टेडियममध्ये गोंधळ उडाला तसेच प्रेक्षकांनी देखील आरडाओरड केली. चूक लक्षात आल्यावर लगेचच इंग्लंडचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

हेही वाचा : भारत - पाक सामन्यात प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल... कॅप्टन रोहित 'या' गोलंदाजांना देणार संधी?

 

पाहा व्हिडीओ : 

भारत - पाकिस्तान सामना कधी? 

23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार असून दुपारी 2: 30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यापूर्वी अर्धातास अगोदर टॉस पार पडेल.  

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंगटन सुंदर.

नॉन-ट्रॅवलिंग सब्स्टीट्यूट: यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे