Chava Cinema: सध्या सर्वत्र छावा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाची प्रशंसा होत आहे. मात्र गणोजी शिर्केंच्या वंशजांनीच चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतलाय. त्यामुळे यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्यशाली इतिहासावर आधारित छावा चित्रपटाबाबत आणखी एक वाद उफाळून आलाय. समस्त मराठीजनांच्या पसंतीस उतरलेल्या छावा चित्रपटाबाबत राजेशिर्के घराण्यानं आक्षेप घेतलाय. चित्रपटाच्या माध्यमातून राजेशिर्के घराण्याची बदनामी करण्यात आलीय. चुकीची दृश्य काढून टाका अन्यथा आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा दीपक राजेशिर्केंनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांना दिलाय.
छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या लढाया आणि औरंगजेबानं त्यांचे केलेले हाल याबद्दलचा इतिहास मांडलाय. यात कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असं दाखवण्यात आलंय. यावरच राजेशिर्केंनी आक्षेप घेतलाय. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केलीय. जाणीवपूर्वक इतिहास बदललाय. आमच्या घराण्याविरोधात षड्यंत्र करत बदनामी केली जात आहे. कुठलाही पुरावा नसल्याचा आरोप दीपक शिर्के यांनी केलाय. या चित्रपटामध्ये शिर्के सरदारांची बदनामी करण्यात आली. त्यामुळे चित्रपटातील तो प्रसंग हटवण्यात यावा. अन्यथा चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक तसंच छावाच्या प्रकाशकांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर जादू केलेल्या छावा चित्रपटावर आता राजेशिर्के घराण्यानं आक्षेप घेतलाय. गणोजी शिर्केंच्या वंशजांनीच चित्रपटातल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू निर्माण केली आहे. या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसापासूनच मोठी कमाई केली आहे आणि ती आतापर्यंत सुरूच आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, सातव्या दिवशी, गुरुवारी, या चित्रपटाची कमाई मागील तीन दिवसांच्या तुलनेत कमी झाली आहे, परंतु ही चिंतेची बाब नाही. सोमवारी या चित्रपटाने 24 कोटी, मंगळवारी 24.50 कोटी आणि बुधवारी सुमारे 32 कोटींची कमाई केली होती, तर आता गुरुवारी या चित्रपटाने सुमारे 22 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे, चित्रपटाने आतापर्यंत देशभरात सुमारे 219.75 कोटी रुपये कमावले आहेत.
'छावा'ने सातव्या दिवसाच्या कमाईने अनेक चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. सातव्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत 'छवा'ने अनेक हिट चित्रपटांना मागे टाकले आहे. विकी कौशलच्या या चित्रपटाने 22 कोटींची कमाई करून जवान, दंगल, चेन्नई एक्सप्रेस आणि स्त्री 2 सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. सातव्या दिवशी 'जवान'ने 21.3 कोटी, 'दंगल'ने 19.89 कोटी, 'चेन्नई एक्सप्रेस'ने 19.6 कोटी आणि 'स्त्री 2'ने 19.5 कोटी कमावले, जे 'छावा'पेक्षा कमी आहे. छावा आता 300 कोटी रुपयांच्या आकड्याकडे लक्ष ठेवून आहे.या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट 250 कोटींचा टप्पा ओलांडेल असा दावा केला जात आहे. जर असे झाले तर चित्रपट 300 कोटींचा टप्पा सहज पार करेल.