शंभूराजांच्या स्मारकाच्या बातमीनंतर सरकारला खडबडून जाग, जीर्णोध्दारासाठी सरकारच्या हालचाली

छत्रपती शंभूराजांच्या स्मारकाच्या दुरवस्थेची बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर सरकार खडबडून जागं झालंय.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 22, 2025, 07:42 PM IST
शंभूराजांच्या स्मारकाच्या बातमीनंतर सरकारला खडबडून जाग, जीर्णोध्दारासाठी सरकारच्या हालचाली

छत्रपती शंभूराजांच्या स्मारकाच्या दुरवस्थेची बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर सरकार खडबडून जागं झालंय. महायुती सरकारनं पुढच्या एक वर्षांत स्मारकाची डागडुजी करुन सुसज्ज स्मारक बांधण्याची घोषणा केलीय. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्मारकासाठी 5 कोटींच्या निधीची घोषणा केल्याचा उदय सामंत यांनी दावा केलाय.

शंभूराजांच्या स्मारकाच्या बातमीनंतर सरकारला खडबडून जाग

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची सरकारकडून झालेली उपेक्षा सरकारनं दाखवली. सरकारी अनास्थेचा बळी ठरलेलं स्मारक झी 24 तासनं जगासमोर आणून दाखवलं. संभाजी महाराजांच्या स्मारकाची दूरवस्था समोर आणल्यानंतर सरकारी पातळीवर लपवाछपवीचा खेळ सुरु झाला. झी 24 तासनं संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या दुरवस्थेचा मुद्दा पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी स्मारकाच्या देखभालीसाठी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात 5 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं.

सरकारनं 5 कोटींची तरतूद केली पण तो पैसा तो निधी स्मारकापर्यंत आलाच नसल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय. सरकारचा निधी आला असता तर स्मारकाची ही दूरवस्था झालीच नसती असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर सरकारनं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची उभारणी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलाय.

स्मारकाच्या जीर्णोध्दारासाठी सरकारच्या हालचाली

सरकार छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी कटीबद्ध असल्याचं उदय सामंतांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यात स्मारकाच्या पाहणीसाठी कसबा गावात जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. एवढंच नाहीतर पुढच्या वर्षभरात त्या ठिकाणी सुसज्ज असं स्मारक उभारण्याची घोषणाही सरकारनं केलीय. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनीही स्मारकाबाबत प्रत्यक्ष कृती करुन दाखवू अशी भूमिका घेतलीये. स्मारकासाठी स्वतः पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिलीये.

छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक झालंच पाहिजे. दुरावस्थेच्या गर्तेतून या स्मारकाला काढून सामान्य शिवप्रेमींना प्रेरणा देणारं स्मारक उभं राहावं ही झी 24 तासची भूमिका आहे. जोपर्यंत या स्मारकाचा जीर्णोध्दार होत नाही तोपर्यंत झी 24 तास ही मोहीम सुरुच ठेवणार.