कोल्हापूरच्या रेड्याचा नादच खुळा, एसी गाडीतून करतो प्रवास, रूबाब पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

सोलापुरातल्या कृषी प्रदर्शनात 'राधा' नावाची बुटकी म्हैस पाहिल्यानंतर आता कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनातील 'विधायक' नावाचा रेडा सध्या चर्चेत आलाय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 22, 2025, 08:47 PM IST
कोल्हापूरच्या रेड्याचा नादच खुळा, एसी गाडीतून करतो प्रवास, रूबाब पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

Kolhapur : अनेक ठिकाणी वेगवेगळी कृषी प्रदर्शनं भरवली जातात. ज्यामध्ये काहीच गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर होत असते. ज्यामध्ये त्यात येणाऱ्या पशुपक्ष्यांमुळे. सोलापुरात देखील काही दिवसांपूर्वी कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. ज्यामध्ये 'राधा' नावाची बुटकी म्हैस बघायला मिळाली होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनाची चर्चा होतेय. या कृषी प्रदर्शनात एक लय भारी गडी आलाय. विधायक नावाचा हा रेडा आहे. काय आहेत त्याची वैशिष्ट्यं जाणून घेऊयात सविस्तर 

कोल्हापूरच्या रेड्याचा नादच खुळा

कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात एका रेड्याची चर्चा रंगलीय. त्या रेड्यानं कोल्हापूरकरांची मनं जिंकली. ज्यामध्ये त्याच नाव विधायक आहे. हा साधासुधा गडी नाहीये. दिसायला देखील हा एकदम रुबाबदार असा पठ्ठ्या आहे. या रेड्याचं वजन जवळपास दीड टन आहे. त्यासोबतच त्याची उंची पाच फूट सात इंच आहे. कोल्हापूरमध्ये आलेल्या या रेडा जगातला सर्वात उंच रेडा म्हणून याची ख्याती आहे. तुम्हाला पण हा रेडा पाहायचा असेल तर तुम्हाला कोल्हापूर गाठावं लागेल. तिथल्या मेरी वेदर मैदानात पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं भीमा कृषी पशू प्रदर्शन भरलं आहे. 

 कोल्हापूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय 'विधायक' रेडा

या प्रदर्शनात विविध पशुपक्षी देखील तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे साहजिकच पशुपक्षीप्रेमींसोबत शेतकऱ्यांची पावलं या कोल्हापुरातील प्रदर्शनाकडे वळली आहेत. याच प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो मुऱ्हा जातीचा रेडा. सात वेळा जागतिक चॅम्पियनशिप या रेड्यानं पटकावली आहे. या विधायकाबद्दल जाणून घ्यायला सर्वच उत्सुक असल्यानं आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मालकाला गाठलं. मालक आपल्या रेड्याची जीवापाड काळजी घेत असल्याच सध्या समोर आलं आहे. या रेड्याच्या सेवेसाठी 24 तास एक माणूस त्याच्याजवळ असतो. विशेष म्हणजे हा रेडा सतत एसी गाडीतून फिरतो. उन्हाळ्यात गरमी पासून त्याचा बचाव करण्यासाठी त्याच्या गोठ्यातही एसी लावण्यात आला आहे. सध्या हरियाणातून आलेला या मजबूत बांध्याचा 'विधायक' रेडा कोल्हापूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे.