Maharashtra Weather News: मुंबईसह महाराष्ट्रातील तापमानात सातत्यानं चढ उतार होताना दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णता जाणवू लागली आहे. दरम्यान मुंबई शहर तापले आहे. आठवडाभर रात्री आणि पहाटे गारवा अनुभवल्यानंतर आता मुंबईत उष्णता वाढली आहे. दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानातही वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शुक्रवारी ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने हा उकाडा अजून दोन – तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली असली तरी गुरुवारपासून किमान तापमानातही वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना दिवसभर असह्य उकाडा सहन करावा लागत असून दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. शहरात सध्या तापमानाचा आकडा 36 अंशांवर असला तरीही त्याचा दाह मात्र 38 अंश सेल्सिअसइतका जाणवू लागल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कुलाबा येथे तापमान दोन अंशानी अधिक असे नोंदवले गेले आहे . तर सांताक्रूझ येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशाने अधिक नोंदले गेले.
हवामान खात्याच्या अहवालानुसार 22 फेब्रुवारीला मुंबई शहरात आकाश निरभ्र असेल. शनिवारी किमान तापमान २१ अंश सेल्सिअस ते ३४ अंश सेल्सिअस राहील.
महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्यात सध्या उष्णतेचं सत्र सुरू झालं असून, त्यामुळं बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, किमान आणि कमाल तापमानामध्ये बराच फरकही पाहायला मिळत आहे. राज्याच्या विदर्भ क्षेत्रामध्ये उष्णता दर दिवसागणिक वाढत असून, काल तिथला पारा 38 अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील काही शहरात काही भागांमध्ये दिवसा घाम येणार उकाडा तर रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र हवेत गारठाही जाणवत आहे.