Pune Politics: विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीमधील घटक पक्ष सोडून गेलेल्या अनेकांची घरवापसी झालेली असतानाच दुसरीकडे पराभवाचा धक्का बसलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधून आऊट गोईंग सुरु आहे. विधानसभेला काँग्रेस पक्षालाही फारसं यश मिळालं नसून पक्षात अस्वस्थता दिसून येत आहे. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असून दमदार नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी धडपड सुरु आहे. असं असतानाच या निवडणुकींआधी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसणार असल्याच्या चर्चा असून मागील काही दिवसांमध्ये तसं चित्रही पाहायला मिळालं आहे. मात्र आता या धक्कातंत्रामध्ये पुण्यातील एका बड्या नावाची चर्चा असून ही चर्चा एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे आहे.
पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, या चर्चानंतर धंगेकरांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं. आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसून मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे, असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं होतं. तसेच आपण वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, असंही रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे धंगेकर काँग्रेसमध्येच राहतील असं म्हटलं जातं होतं. मात्र आता त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे ते काँग्रेस सोडणार असं निश्चित मानलं जात असल्याची चर्चा आहे. यामागील कारण म्हणजे या स्टेटसमध्ये धंगेकरांच्या गळ्यात भगवं कापड असून त्यांनी स्टेटससाठी सूचक गाणं निवडलं आहे.
गळ्यात भगवा परिधान करुन स्वत:चा फोटो स्टेटसला ठेवत धंगेकरांनी या स्टेटसला 'शाह का रुतबा' हे गाणं ठेवलं आहे. पुण्यातील राजकीय वर्तुळामध्ये धंगेकरांच्या व्हाट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा आहे. "तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी... तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही" हे गाणं स्टेट्स ठेऊन रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना सूचित इशारा दिल्याचं बोललं जात आहे.
नक्की वाचा >> संगमेश्वरमधील संभाजी महाराजांच्या स्मारकात मद्यपींचं वास्तव्य! 80 लाख खर्च करुनही मोडलेली दारं अन्...
काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मुद्दाम हे स्वकीयांना डिवचणारं स्टेट्स ठेवल्याचं सांगितलं जात आहे. नुकतीच एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट आणि आता भगव्यासह ठेवलेल्या स्टेटसमुळे धंगेकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
30 जानेवारी रोजी एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धंगेकरांनी, "शिवसेनेत (शिंदे गट) जाण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही. वैयक्तिक कामानिमित्त भेटलो, कामाच्या संदर्भानेच चर्चा झाली, बाकी काही नाही. मी काँग्रेस पक्षातच आहे आणि वैयक्तिक कामाला कोणी कोणाला भेटू नये असं कोणी म्हटलेलं नाही. सर्वजण एकमेकांना भेटतात मग मी भेटलं त्यात गैर काय?” असा प्रतिप्रश्न केला होता. तसेच या भेटीबद्दल एकनाथ शिंदेंकडे प्रसारमाध्यमांनी विचारपूस केली असता त्यांनी, “रविंद्र धंगेकर हे त्यांच्या कामानिमित्त भेटीला आले होते," असं सांगितलं होतं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी रवींद्र धंगेकर यांचा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने पराभव केला.