Success Story: अपयश आल्याने घर विकण्याची वेळ; विराज 'असा' बनला 10000000000 रुपयांचा मालक!

Viraj Bahal Success Story: विराज बहल वीबा फूड्सचे संस्थापक आहे. ही कंपनी सॉस, चटणी आणि पीनट बटर सारखी उत्पादने बनवते. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 22, 2025, 02:34 PM IST
Success Story: अपयश आल्याने घर विकण्याची वेळ; विराज 'असा' बनला 10000000000 रुपयांचा मालक!
विराज बहल

Viraj Bahal Success Story: गेल्या काही वर्षांत देशात स्टार्टअप्सची वाढ झपाट्याने झाली आहे. फ्लिपकार्ट, ओला आणि अर्बन कंपनी सारख्या स्टार्टअप्सनी लोकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सर्व यशोगाथांमध्ये एक गोष्ट समान गोष्टीचा धागा काय आहे? तुम्ही ओळखलात का? आता यशस्वी दिसत असलेल्या संस्थापकांनी त्यांच्या चांगल्या नोकऱ्या सोडून हा धोका पत्करला. पण आता त्यांच्या यशाची कहाणी तुमच्यासमोर आहे. उद्योजक विराज बहल यांची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. विराजने वीबा ब्रँडचा पाया घातला. विराजबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल पण त्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची चव लाखो लोकांच्या जिभेवर आहे.

उत्पादन तयार करणारी कंपनी

विराज बहल वीबा फूड्सचे संस्थापक आहे. ही कंपनी सॉस, चटणी आणि पीनट बटर सारखी उत्पादने बनवते. या ब्रँडला शून्यावरून हजारो कोटींवर नेण्यासाठी विराजला खूप संघर्ष करावा लागला. वीबा फूड्सची सुरुवात 2013 मध्ये झाली. पण विराजने स्वत:च्या उद्योजकतेला खूप आधी सुरुवात केली होती. विराजचे वडील राजीव बहल हेही उद्योग क्षेत्रात होते. त्यांना लहानपणापासूनच फूड इंडस्ट्रीत रस होता. विराजने वडिलांसोबत आहार दिल्ली व्यापार मेळाव्यात 'फन फूड्स' स्टॉलवर काम करुन आपल्या करिअरला सुरुवात केली. 

कुटुंबाचा व्यवसाय विकावा लागण्याची वेळ

विराज 2002 मध्ये त्यांच्या वडिलांच्या फन फूड्स या व्यवसायात सामील झाला. पण 2008 मध्ये विराजच्या वडिलांनी आपली 'फन फूड्स' कंपनी एका जर्मन कंपनी डॉ. ओएटकरला 110 कोटी रुपयांना विकली. विराजचे वडील राजीव बहल आपल्या निर्णयावर ठाम होते पण विराजला हा निर्णय मान्य नव्हता.

हॉटेल उद्योगात अपयश

फन फूड्स विकल्यानंतर विराजने हॉटेल व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्याने एक रेस्टॉरंट सुरू केले. पण यात तो पूर्णपणे अयशस्वी ठरला. या 5 वर्षांत त्याचे मोठे नुकसान झाले आणि त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. काळ कठीण होता पण असे सर्व असूनही त्याने हार मानली नाही. विराजने त्याच्या चुकांमधून शिकण्याचा आणि नवीन ध्येयाकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला.

आर्थिक अडचणीमुळे घर विकले

व्यवसायात अपयशावर अपयश येत चालले होते पण विराज बहल आपल्या स्वप्नांवर काम करणे थांबवत नव्हता. या कठीण काळात त्याने आपले घर विकून एक नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. पत्नी रिधिमा बहलशी त्याने घर विकण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. यावर'जर व्यवसाय हा तुझा छंद असेल तर घर विकूया!', असे तिने सांगितले. मग घर विकून मिळालेल्या पैशातून विराजने एक कारखाना स्थापन केला. त्याचा ब्रँड वीबा सुरू केला. त्याने त्याचे नाव त्याच्या आई विबा बहलच्या नावावरून ठेवले.

पहिल्या दोन वर्षात ऑर्डरच नाही

वीबाची सुरुवात अजिबात सोपी नव्हती. पहिल्या दोन वर्षात कंपनीला कोणत्याही प्रकारची ऑर्डर मिळाली नाही. परिस्थिती बिकट होत चालली होती. विराजला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात अडचणी येऊ लागल्या. या काळातही विराजने आपले धाडस कायम ठेवले. त्याच्या कठोर परिश्रमामुळे त्याचे नशीब बदलले. डोमिनोजने त्याला ७० टन पिझ्झा सॉसची ऑर्डर दिली. ही ऑर्डर वीबासाठी गेम चेंजर ठरली. यानंतर कंपनीने कधीही मागे वळून पाहिले नाही. हळूहळू वीबाने आपल्या उत्पादन श्रेणीचा विस्तार करून भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत केली. आज वीबा कंपनीने सुमारे 1000 कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. ही कंपनी देशभरात सॉस, मेयोनेझ आणि मसाल्यांचा पुरवठा करते.