Maha Shivratri 2025 Date: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. महाशिवरात्री ही भगवान शंकराला समर्पित आहे. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरा करण्यात येते. महाशिवरात्री ही साधारण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येते. यादिवशी भक्त महादेवाची पूजा करुन उपवास ठेवतात. यादिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करणे शुभ मानले जाते. या दिवशी जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. असं मानलं जातं की या दिवशी महादेवाच्या कृपेने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला सुख - समृद्धी प्राप्त होते. यंदा महाशिवरात्री तारखेबद्दल संभ्रम आहे.
या वर्षी महाशिवरात्री पंचांगानुसार, माघ कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.08 वाजेपासून 27 फेब्रुवारीला सकाळी 08:54 पर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री उपवास आणि पूजा करायची आहे.
26 फेब्रुवारीला, म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी, सकाळी 11:03 ते रात्री 10:17 पर्यंत भद्राची सावली असणार आहे. सनातन धर्मग्रंथांनुसार, भद्रा दरम्यान शुभ कार्य केली जात नाहीत. स्वर्ग आणि पाताळातील भद्रा अशुभ मानली जात नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी भद्रा पाताळात वास आहे म्हणून अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही महादेवाची पूजा करता येणार आहे.
महाशिवरात्रीला निशिता काळातील पूजेचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी निशिता पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 12:09 ते रात्री 12:59 पर्यंत असेल. तंत्र, मंत्र आणि सिद्धीच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत शुभ मानला गेला आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरात पूजा केली जाते.
· रात्रीच्या प्रथम प्रहार पूजा वेळा - संध्याकाळी 06:19 ते रात्री 09:26
· रात्री द्वितीय प्रहार पूजा वेळ - 27 फेब्रुवारी रात्री 09:26 ते 12:34
· रात्रीचा तिसरा प्रहार पूजेचा वेळ - 27 फेब्रुवारी रात्री उशिरा 12:34 ते पहाटे 03:41
· रात्री चौथी प्रहार पूजा वेळ - 27 फेब्रुवारी मध्यरात्री 03:41 ते सकाळी 06:48
महाशिवरात्रीला, भाविक शिवलिंगाचा जलाभिषेक करतात. ब्रह्म मुहूर्त हा जलाभिषेकासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेला रुद्राभिषेक देखील विशेष फलदायी मानला जातो. या दिवशी, शिव संपूर्ण दिवस उपस्थित राहतात, म्हणून भक्त त्यांच्या सोयीनुसार कधीही रुद्राभिषेक करु शकणार आहेत.
महाशिवरात्रीचे व्रत करणारे भाविक गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:48 ते 08:54 या वेळेत उपवास सोडू शकतात. शास्त्रांनुसार, या काळात उपवास सोडणे शुभ मानले गेले आहे. महाशिवरात्रीला योग्य पद्धतीने उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)