Rahuri Crime: अनैतिक संबंधाचा शेवट धक्कादायक होतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकारात दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की त्याने प्रयेसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रियकराने त्याच्या प्रेयसीची क्रूर हत्या केल्याची घटना घडली. राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात हा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. संतापलेल्या प्रियकराने कोयत्याचे वार करून प्रियसीचे शीर धडापासुन वेगळे केले. भर रस्त्यात तडफडत प्रेयसीचा अंत केला.
19 फेब्रुवारीच्या रात्री ही घटना घडली. सोनाली राजू जाधव असे मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव असून ती 28 वर्षांची होती. पुणे जिल्हयातील पोखरी येथे ती वास्तव्यास होती. सोनालीचा पती राजू जाधव हा 7 वर्ष तुरूंगात होता. दरम्यानच्या काळात तिचे सखाराम धोंडाजी वालकोळी याच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्याचे वय 53 वर्षे असून तो पुण्यातील आंबेगावच्या निरगुडसर येथे राहणार आहे.
सोनाली आणि सखाराम दोघेजण काही काळ एकत्रदेखील राहिले. काही दिवसांपुर्वी सोनालीचा पती तुरूंगातून बाहेर आला. यानंतर सोनालीने तिचा प्रियकर सखाराम याला सोडले आणि ती पतीकडे निघून गेली. पण सखारामला हे नाते तोडायचे नव्हते. मला तुझ्याकडे यायचे आहे , तु मला सांभाळले नाही तर मी तुला सोडणार नाही. तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करेल अशी धमकी प्रियकर सखाराम तिला वारंवार देऊ लागला.
त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी दोघे अहिल्यानगर बस स्थानकावर भेटले. त्यानंतर सखारामने सोनालीला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे नेले.तेथील महादेव मंदिराच्या डोंगराजवळ दोघांनी गप्पा मारल्या आणि त्यानंतर दोघात वाद झाला. सखारामने सोनालीला आधी लाकडी दांडक्याने मारले. मग त्याने जवळच हाती लागलेल्या दगडाने तिला मारहाण केली. यानंतर त्याने सोनालीवर कोयत्याने वार केले आणि तिचे शीर धडापासुन वेगळे केले.
घटनेनंतर आरोपी वांबोरी पोलीस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.याप्रकरणी आरोपी सखाराम वालकोळीवर बीएनएस कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.