11 Feb 2025, 13:45 वाजता
माजी महिला नगरसेविकेच्या घरी चोरी! 14.40 लाखांच्या मुद्देमालासहीत चोर सापडला
अमरावतीत माजी नगरसेविका लविना हर्षे यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आंतरराजीय घरफोडीच्या टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सतनामसिंग बावरी असे आरोपीचे नाव. त्याच्या ताब्यातून 14.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर चोरीत सहभागी असलेले त्याचे अन्य दोन साथीदार पोलिसांच्या रडारवर. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ही कारवाई केली. हर्ष या प्रयागराज येथे गेले असतात चोरट्यांनी सादर चोरी केली.
11 Feb 2025, 13:43 वाजता
सणसवाडी परिसरात गॅस कटरच्या साहाय्याने एटीम फोडले सोळा लाख रुपये लंपास
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात असणाऱ्या एस.बी.आय बँकचे (SBI bank ATM) एटीएम चोरट्यानं रात्रीच्या वेळेस गॅस कटरच्या साहाय्याने फोडून अंदाजे सोळा लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास पथके नेमून तपास सुरू केला आहे.
11 Feb 2025, 13:01 वाजता
मुंबई पोलीस रणवीर अलाहबादीच्या घरी पोहचले
मुंबई पोलिसांची टीम युट्यूबर रणवीर अलाहबादीच्या घरी पोहोचली आहे. त्याने समय रैनाच्या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचलेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
11 Feb 2025, 12:02 वाजता
परिवहन मंत्र्यांकडून अचानक टोलनाक्याची पहाणी; व्यवस्थापकाला इशारा देत म्हणाले, "शनिवारपर्यंत..."
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दहिसर टोल नाक्यावर पाहणी केली. दहिसर टोल नाक्यावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना तातडीने राबवण्याचे आदेश त्यांनी दिलेत. टोलनाक्याची पाहणी करताना त्यांनी टोल व्यवस्थापनाला कडक शब्दांत सुनावले आहे. उपाययोजना राबविण्यासाठी ठेकेदारांना येत्या शनिवारपर्यंत अंतिम अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा, संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांचे करार रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
11 Feb 2025, 11:19 वाजता
'आप' पक्ष फुटण्याची भीती असल्याने केजरीवालांनी बोलावली बैठक
आम आदमी पार्टीच्या पंजाबमधील सर्व आमदारांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मानही सहभागी होणार आहेत. पक्ष फुटण्याच्या संकेतांमुळे रणनितीवर चर्चेसाठी 'आप'चे राष्ट्रीय संयोजक केजरीवालांनी बैठक बोलवली आहे.
11 Feb 2025, 11:18 वाजता
मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये दाखल झाले आहेत. मोदींचं पॅरिसमधील भारतीयांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. पॅरीसमध्ये एयरपोर्टवर मोदींना गॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं आहे. मोदी आज फ्रान्सचे राष्ट्रपती इमन्युएल मेक्रो यांच्यासह शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.
11 Feb 2025, 11:15 वाजता
माघ पौर्णिमेची तयारी पूर्ण
लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारकडून महाकुंभमेळ्यातील माघ पौर्णिमेची तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडियो कॉन्फ्रेंसिंगद्वारे बैठकीत आढावा घेतला.
11 Feb 2025, 11:14 वाजता
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रणवीर अलाहबादियाला नोटीस
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची यूट्यूबर रणवीर अलाहबादियाला नोटीस पाठवली आहे. अश्लील प्रश्नाचा व्हिडीओ हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 'इंडिया गॉट लॅटंटमधील कंटेट'ची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे.
11 Feb 2025, 11:12 वाजता
'इंडिया गॉट लेटंट'मधील युट्यूबर्सवविरुद्ध गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्यांची माहिती
'इंडिया गॉट लेटंट' शोमधील यूट्यूबर्स विरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोमधील अश्लील कंटेटविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून दिली आहे.
11 Feb 2025, 11:10 वाजता
आज संसदेत नवीन कर विधेयक मांडलं जाणार
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत. नवीन कर विधेयक आज मांडलं जाण्याची शक्यता आहे.