'...म्हणून पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना जिंकावा'; माजी भारतीय क्रिकेटरनं सांगितलं कारण

Champions Trophy 2025 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आजचा सामना दुबईच्या मैदानात होणार असून त्यापूर्वीच भारताच्या माजी क्रिकेटपटूने हे विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 23, 2025, 07:44 AM IST
'...म्हणून पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना जिंकावा'; माजी भारतीय क्रिकेटरनं सांगितलं कारण
भारत पाकिस्तान सामन्याआधी केलं विधान

Champions Trophy 2025 India vs Pakistan: भारताचा माजी क्रिकेटपटू अतुल वासनने (Atul Wassan) एक विचित्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. पाकिस्तानचा संघ भारताविरूद्धचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 23 फेब्रुवारीचा सामना जिंकवा अशी आपली इच्छा असल्याचं या माजी क्रिकेपटूने म्हटलं आहे. दुबईच्या मैदानात होणाऱ्या या सामन्यामध्ये भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान जिंकावा असं आपल्याला काय वाटतंय याबद्दलचा खुलासाही अतुलने केला आहे.

पाकिस्तानसाठी अवघड गणित

स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पारभूत झालेल्या पाकिस्तानला स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक आहे. कराचीच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धचा स्पर्धेतील पहिलाच सामना यजमान पाकिस्तानने 60 धावांनी गमावला आहे. न्यूझीलंडप्रमाणेच पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना गमावल्यास त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:च्या कामगिरीबरोबरच इतर संघांची कामगिरी आणि बऱ्याच शक्यतांवर अलंबून रहावं लागणार आहे. याच साऱ्याचा विचार करुन अतुल वासनने पाकिस्तानचा भारताविरूद्धच्या सामन्यात विजय झाला तर मालिका अधिक रंजक होईल असा युक्तिवाद केला आहे.

...म्हणून पाकिस्तानने जिंकावं

"मला वाटतं की भारताविरूद्धचा सामना पाकिस्तानने जिंकावा. असं झालं तर संपूर्ण स्पर्धेचा विचार करता अधिक मजा येईल. तुम्ही पाकिस्तानला जिंकून दिलं नाही तर काय मिळणार? पाकिस्तानचा विजय झाला तर स्पर्धेत जिवंतपणा टिकून राहील. तोलामोलाचा सामना झाला पाहिजे," असं अतुल वासनने एएनाय या वृत्तसंस्थेची संवाद साधताना म्हटलं आहे.

सर्वोत्तम संघ निवडला

अतुल वासनने भारतीय संघाच्या फलंदाजीचं विश्लेषण करताना अगदी तळापर्यंत भारतीय संघ फलंदाजी करुन शकतो या गोष्टीचं कौतुक केलं. सध्याची स्थिती पाहता भारताने फिरकी गोलंदाजांना प्राधान्यक्रम देत खेळण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्यच असल्याचं अतुलचं म्हणणं आहे. दुबईमधील परिस्थिती पाहता पहिल्या सामन्यात खेळवण्यात आलेलं कॉम्बीनेशन सर्वोत्तम होतं असं अतुल म्हणाला आहे.

नक्की वाचा >> '...तर रोहित 60 बॉलमध्येच शतक झळकावेल'; Ind Vs Pak मॅच आधी युवराजचं भाकित

विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा

"तुमच्याकडे अनेक उत्तम फलंदाज आहेत. शुभमन गील, रोहित शर्मा, विराट कोहली. तुम्ही अगदी आठव्या क्रमाकांच्या खेळाडूपर्यंत म्हणझेच अक्षर पटेलपर्यंत फलंदाजी करु शकता. रोहितने पाच फिरकीपटूंना संधी दिली आहे. दुबईचा विचार केल्यास ही उत्तम निवड आहे. तुम्ही जे करताय त्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा," असा सल्ला अतुलने भारतीय संघाला दिला आहे.

भारताने विजयासहीत केली सुरुवात

सध्याच्या स्पर्धेत पाकिस्तानचा श्रीगणेशा पराभवाने झाला असला तरी भारताने बांगलादेशविरुद्धचा आपला स्पर्धेतील पहिलाच सामना 6 विकेट्स आणि 21 बॉल राखून जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.