गळ्याच्या खालच्या भागात असलेल्या एन्डोक्राइन ग्रंथीला थायरॉईड ग्रंथी असे म्हणतात. ही ग्रंथी थायरॉईड हार्मोन्स निर्माण करते, जे आपला मेंदू, हृदय, सांधे आणि इतर अवयवांची कार्ये सुरळीतपणे चालावीत तसेच ऊर्जा नियमनासाठी देखील महत्त्वाचे असतात. हायपरथायरॉइडिजम आणि हायपोथायरॉइडिजम हे दोन सर्वात सर्रास आढळून येणारे थायरॉईड विकार आहेत. चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईच्या एन्डोक्रिनॉलॉजी आणि डायबेटॉलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ निशा कैमल यांच्याकडून...
थायरॉईड ग्रंथीमधून स्रवणाऱ्या थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण जेव्हा खूप जास्त असते तेव्हा हायपरथायरॉइडिजम विकार होतो. ग्रेवचा आजार हे हायपरथायरॉइडिजमचे सर्वात मोठे कारण असते. ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे. थायरॉईड नोड्यूल्स किंवा थायरॉईडीटीस ही देखील इतर कारणे असतात (थायरॉईड ग्रंथीला येणारी सूज). हृदयाचे ठोके वेगाने पडणे, वजन कमी होणे, हातांना कंप सुटणे, अस्वस्थ वाटणे, नैराश्य, पुन्हा-पुन्हा शौचाला जावे लागणे आणि झोप नीट न लागणे ही याची काही लक्षणे आहेत. यावर वेळीच उपचार न केल्यास थायरोटॉक्सीकोसिसमुळे काही गंभीर सहव्याधी आणि कार्डियाक गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे वरील सर्व किंवा त्यापैकी काही जरी लक्षणे दिसत असली तरी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. अँटीथायरॉईड औषधे घेऊन हायपरथायरॉइडिजम नियंत्रणात ठेवता येतो.
थायरॉईड ग्रंथीमधून स्रवणाऱ्या थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण जेव्हा कमी असते तेव्हा हायपोथायरॉइडिजम विकार होतो. थायरॉईड ग्रंथीची निष्क्रियता हे हायपोथायरॉइडिजमचे सर्वात मोठे कारण असते. भारतामध्ये हा थायरॉईड विकार सर्वात जास्त आढळून येतो. दर दहापैकी एका वयस्क व्यक्तीला हायपोथायरॉइडिजम असतो. ऑटोइम्युन थायरॉईडीटीस, आयोडीनची कमतरता, रेडिओआयोडीन उपचार किंवा थायरॉईड ग्रंथी सर्जरी करून काढून टाकलेली असणे ही हायपोथायरॉडिजमची कारणे आहेत. हा विकार असलेल्या वयस्क व्यक्तींमध्ये कमजोरी, खूप जास्त थंडी वाजणे, कोरडी त्वचा, बद्धकोष्ठता, वजन वाढणे, केस पातळ होणे, चेहरा फुगलेला दिसणे, आवाजात खरखर येणे, स्नायू दुखणे, मासिकपाळीमध्ये खूप जास्त ब्लीडींग, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे आणि हृदयाचे ठोके मंदावणे अशी लक्षणे आढळून येतात. जन्मजात हायपो थायरॉइडिजम असलेल्या मुलांमध्ये हा विकार वेळीच लक्षात न आल्यास आणि त्यावर उपचार केले न गेल्यास, गंभीर न्यूरॉलॉजिकल असामान्यत्व असू शकते, त्यांच्या मेंदूचा विकास अपुरा राहू शकतो. जन्मानंतर लगेचच रक्ततपासणी करून अगदी सहजपणे याचे निदान करता येते. टॅबलेट स्वरूपात थायरॉक्सिन रिप्लेसमेंट देऊन हायपोथायरॉइडिजम पुरेसा नियंत्रणात ठेवता येतो.
थायरॉईड विकार होण्याचा धोका पुरुषांपेक्षा ५ ते ८ पट जास्त महिलांना असतो. वृद्धत्व, इतर ऑटोइम्युन स्थिती जसे की, टाईप १ डायबिटीस आणि सेलिॲक आजार, कुटुंबामध्ये आधी कोणाला थायरॉईड आजार झालेला असणे, मानेला रेडिएशन दिलेले असणे यासारख्या कारणांमुळे देखील थायरॉईड विकारांचा धोका बळावतो. हायपो थायरॉइडिजमच्या रुग्णांना बऱ्याचदा कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे जर वर दिलेले कोणतेही जोखीम घटक तुमच्या बाबतीत असतील तर लक्षणे दिसत नसताना देखील रक्ततपासणी करून घेणे आवश्यक आहे.
एकूण गरोदर महिलांपैकी २ ते ३ टक्के महिलांना थायरॉईड आजार होतो. गरोदरपणात हायपोथायरॉइडिजम असेल आणि त्यावर उपचार केलेले नसतील तर बाळाचा मेंदूचा विकास अपुरा राहू शकतो. ज्या महिलांना आधीपासूनच हायपोथायरॉइडिजम आहे त्यांनी गरोदर होण्याच्या आधी त्यांच्या थायरॉईड हार्मोन्सची पातळी सामान्य आहे अथवा नाही हे तपासून घेणे अत्यावश्यक आहे.
मानेमध्ये, गळ्यामध्ये काहीही गाठ लागत असल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. गळ्यामध्ये सूज असेल आणि जराही दुखत नसेल तर ते थायरॉईड ग्रंथीमधील नोड्यूल किंवा थायरॉईडशी संबंधित नसलेले कारण देखील असू शकते. थायरॉईड नोड्यूल्स सर्रास आढळून येतात आणि वय वाढत जाते तसतसे त्यांचे प्रमाण देखील वाढत जाते. बहुतांश नोड्यूल्स या कॅन्सरच्या दृष्टीने धोकादायक नसतात, पण ५ ते १० टक्के मात्र कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात व त्यांचे निदान लवकरात लवकर केले गेल्यास त्यावर यशस्वीपणे उपचार करता येतात. अल्ट्रासाउंड स्कॅन करून या नोड्यूल्सचा प्रकार ठरवता येतो. स्कॅनचा अहवाल काय येतो त्यानुसार एक फाईन नीडल ऍस्पिरेशन टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो, त्यामुळे निश्चित निदान करता येते.
थायरॉईड विकारांची लक्षणे इतरही अनेक आजारांच्या लक्षणांप्रमाणेच असल्याने हे विकार ओळखू येणे कठीण होऊ शकते. पण या विकारांचे निदान केल्यानंतर मात्र त्यावर उपचार करून घेणे सोपे आहे. म्हणूनच वर दिलेल्यांपैकी कोणतेही लक्षण जाणवत/दिसत असल्यास, फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टीम असणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घेणे,तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.