11 Feb 2025, 11:02 वाजता
शिंदेंच्या योजनांना फडणवीस सरकारकडून कात्री? 'या' 3 योजना होणार बंद?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी योजनांना कात्री लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवभोजन, आनंदाचा शिधा आणि तीर्थदर्शन योजनांवर बैठकीत चर्चेची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी शिवसेनेची प्री कॅबिनेट बैठकही होणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या भेटीआधी शिंदे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीआधीच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक 12:30 वाजता मंत्रालयात पार पडणार आहे.
11 Feb 2025, 10:27 वाजता
नागपूर : ड्रायव्हिंग शिकताना कार विहिरीत कोसळून तिघांचा मृत्यू
सोमवारी रात्री 11 ते 11:30 दरम्यान बुटीबोरी मधील एमआयडीसी परिसरात तीन तरुण कारने जात असताना त्यांची कार रस्त्यालगत असलेल्या कठडा नसलेल्या विहीरीत कोसळली. या घटनेत तिघांचा कारमध्ये अडकल्याने आणि वेळीच बाहेर निघू न शकल्याने बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा बुटीबोरी पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून कार विहिरीतून ओढून बाहेर काढली. मात्र तोवर तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तरुणांपैकी एक जण कार चालवणे शिकत होता आणि त्यादरम्यान ही घटना घडली आहे.
11 Feb 2025, 10:20 वाजता
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे घेणार पोलीस अधीक्षकांची भेट
बीडच्या परळीतील मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेणार आहेत. पोलीस उपाधीक्षकांकडे तपास देऊन अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.
11 Feb 2025, 10:02 वाजता
पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत GBS चे 28 रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गियाबेरेचे आत्तापर्यंत 28 रुग्ण आढळले असून त्यातील 13 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण व्हेंटिलेटर वर आहे. रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून गृह सर्वेक्षण केले जात असून 16 पथकांमार्फत ही कारवाई केली जात आहे.
11 Feb 2025, 10:01 वाजता
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द
बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहे. ज्यात पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी 127 जणांचे शास्त्र प्रमाणे रद्द निलंबित करण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अवैध शस्त्र परवानाचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जिल्ह्यात 1281 जणांकडे शस्त्र परवाना होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेताच, ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा 232 जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवली. त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरण समोर आले आणि शस्त्र परवान्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत आतापर्यंत 310 शस्त्र प्रमाणे रद्द केले आहेत. तर 127 जणांवर कारवाई केलीय. यात आणखी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी आणखी 5 प्रस्ताव पाठवले असून 19 जणांच्या अर्जावर मात्र आक्षेप नोंदवला आहे.
11 Feb 2025, 09:01 वाजता
नाशिकमधून पाकिस्तानला भारतीय लष्कराची गुप्त माहिती पुरवणाऱ्या दोन जवानांना अटक
पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संस्थेसाठी हेर गिरी केल्याच्या संशयावरून पंजाब पोलिसांनी नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटर मधील दोन जवानांना अटक केली आहे. त्यांच्या मूळ गावी पटियालामध्ये हे दोघे असताना त्यांच्या अटकेची कारवाई झाली. आर्टिलरी सेंटर मधील शस्त्रास्त्रांची माहिती लष्करी छावण्यांचे नकाशे हे दोघे व्हाट्सअपद्वारे पाकिस्तानला पाठवायचे. पाकिस्तानच्या शत्रू संघटनेकडून त्यांना 15 लाख रुपये मिळाल्याचे ही चौकशीमध्ये उघड झाला आहे. दोघांकडे हीरोइनसारखे पदार्थ मिळून आल्याने हे दोघे ड्रस विक्रीचे रॅकेट चालवत असल्याचेही पुढे आले आहे. त्या नंतर लष्करामध्ये गंभीरतेने याची दखल घेण्यात आली असून त्यांच्या सोबतचे नाशिकचे सहकारी आणि त्यांचा संबंध असलेल्या लोकांची चौकशी सुरू झाली आहे.
11 Feb 2025, 07:47 वाजता
मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीची आजपासून बारावीची परीक्षा
वैभवी देशमुखची आज बारावीची परीक्षा आहे. आज ती पहिला पेपर देतेय. परीक्षेला निघण्यापूर्वी तिने संतोष देशमुख यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. आज तिचा इंग्रजीचा पेपर होणार असून, जामखेडजवळच्या पाडळी गावात ती परीक्षा देणार आहे. वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवत वैभवी परीक्षेसाठी निघाली आहे.
11 Feb 2025, 07:21 वाजता
धक्कादायक! तुळजाभवानी मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याला गेले तडे
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याच्या कोण शेळीला कडे गेले आहेत. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती, गर्भ गाभारा व मंदिराचं शिखराला धोका निर्माण झाला आहे. मंदिराचं स्ट्रक्चर ऑडिट करून तात्काळ दुरुस्ती करावी असं निवेदन पुजारी मंडळांने मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन ओंबाशे यांना दिली आहे. या निवेदनावर 5000 नागरिक व पुजाऱ्यांच्या सह्या आहेत. पुजारी मंडळाच्या वतीने आई तुळजाभवानीच्या मूर्ती रक्षणासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार हे 5000 सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच तुळजाभवानी मंदिराचा मूळ गर्भ गाभारा काढून त्या ठिकाणी प्रशस्त मोठा गाभारा निर्माण करावा अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याच्या शिळाना तडे जाण्याची घटना गंभीर आहे याकडे गांभीर्याने बघा अशा सूचनाही पुजारी मंडळांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
11 Feb 2025, 06:30 वाजता
कल्याण-शीळफाटा मार्गावरील दुरूस्तीचं काम पूर्ण; वाहतूक पुन्हा सुरु
कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनजवळील निळजे उड्डाणपुलाच्या काम पूर्ण झाले असून रात्री 12 वाजता पुल वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 फेब्रुवारी रात्री 12 ते 10 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत या पाच दिवसांच्या कालावधीत वाहतूक बंद केली होती, आता या पुलाचे काम पूर्ण झाले असून रात्री तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
11 Feb 2025, 06:27 वाजता
येत्या सहा महिन्यात सांगली...; उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा
सांगली जिल्ह्यात येते सहा महिन्यात मोठा प्रकल्प उभारू,अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्याचबरोबर सांगलीमध्ये हळदीचा उपकेंद्र देखील उभारले जाईल,अशी घोषणा देखील मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सांगलीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित उद्योग व व्यापार परिषदेमध्ये ते बोलत होते. सांगलीच्या असणाऱ्या जिल्ह्यातील एमआयडीसीच्या मूलभूत सुविधांचे असणारा प्रश्न लवकरच सोडवला जातील,अशी ग्वाहीही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगलीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित उद्योग व व्यापार परिषद पार पडली. या प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उद्योजक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.