समुद्रात बांधले जाणारे भारतातील पहिले विमानतळ महाराष्ट्रात; कुठे आहे ती जागा?

Airport In Vadhuvan:समुद्रात बांधलेले विमानतळ लवकरच महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 23, 2025, 10:09 AM IST
समुद्रात बांधले जाणारे भारतातील पहिले विमानतळ महाराष्ट्रात; कुठे आहे ती जागा?
maharashtra begins preparations for MMRs third airport near Palghar

Airport In Vadhuvan: महाराष्ट्रात लवकरच आणखी एक विमानतळ उभारण्यात येत आहे. मुंबईलगतच्या पालघरमध्ये हे विमानतळ आकारास येणार आहे. विशेष म्हणजे हे विमानतळ समुद्रात उभारले जाणार आहे. मात्र हा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारच्या विचारधीन आहे. जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेलाच तर समुद्रात उभारलेले पहिले विमानतळ महाराष्ट्रात होईल. 

पालघर मधील होऊ घातलेल्या वाढवण बंदरा जवळच आता कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ तयार करण्याबाबत केंद्र सरकार विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. असं झाल्यास समुद्रात बांधलेले भारतातील हे पहिले विमानतळ असणार आहे. समुद्रात बांधण्यात येणाऱ्या या विमानतळाला केंद्र आणि राज्य सरकारची प्राथमिक मंजुरी मिळाल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

वाढवण बंदर प्रकल्पाचा भूमिपूजन केल्यानंतर पालघरमध्ये विमानतळाच्या प्रस्तावाला वेग आला असून जिल्ह्यात शासनाच्या असलेल्या जमिनीची कमतरता लक्षात घेऊन कृत्रिम बेटावर विमानतळ तयार केले जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
 
वाढवण विमानतळ मुंबईच्या सध्याच्या विमानतळापासून 125 किमी अंतरावर आहे. पश्चिम किनारपट्टीजवळ हे विमानतळ बांधले जाणार आहे. विशेष म्हणजे या विमानतळाची रचना हाँगकाँगचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ओसाकाचे कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्याशी मिळतीजुळती असेल.  ही दोन्ही विमानतळेदेखील कृत्रिम बेटांवर बांधण्यात आली आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण येथे विमानतळ होणार हे भाकित केले होते. नागपूर, शिर्डी विमानतळासह पालघरमध्येही विमानतळ केले जाणार आहे. पालघरला होणारं विमानतळ हे वाढवण बंदरशी जोडलं जाणार असून 10 किमीच्या समुद्रात 20 मीटर डीपड्राप जागा आहे.

वाढवण बंदर ठरणार गेमचेंजर

वाढवण बंदर हे जगातील 10 मोठ्या बंदरापैकी एक आहे. वाढवण बंदराची जागा ही अत्यंत मोक्याची आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेले हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. जेएनपीए येथे सध्या 15 मीटरची खोली प्राप्त असून त्या ठिकाणी १७ हजार कंटेनर (टीईयू) क्षमता असणाऱ्या जहाजांची नांगरणी शक्य होणार आहे. मात्र, वाढवण येथे खोली जास्त असल्याने २४ हटेन क्षमतेपेक्षा अधिक जहाजांची बंदरात ये-जा होऊ शकते.