Gujarati Name Plate In Dombivli : राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक ठळकपणे मराठी भाषेत असावेत असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यभरात हा नियम लागू होतो. दुकानांवर ठळक अक्षरात मराठीतच नाव असण बंधनकारक आहे. डोंबिवलीत मात्र, एका दुकानावर चक्क गुजराती भाषेत नामफलक लावण्यात आले आहे. महाराष्ट्रात गुजराती भाषेत नामफलक लावलाच कसा? गुजराती भाषेत नामफलक लावणाऱ्या दुकानदारावर कारावाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात यावेत असे निर्देश पालिकेने दिले होते. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांना आपले नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक आहे. मात्र, असे असताना डोंबिवली मधील प्रसिद्ध सावरकर रोडवर एका दुकानदाराने नियम मोडत चक्क गुजराती भाषेतील पाटी लावली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि आयुक्त करावाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारमधील सर्व कामकाज मराठीतून व्हावे यासाठी राज्य शासनाने एक कडक निर्णय जारी केला आहे. मराठीची सक्ती करणाऱ्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे बंधन हे राज्य सरकारमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असणार आहे. शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर सुरू होऊन 50 वर्षाहून अधिक काळ झाला असला तरी अनेक ठिकाणी इंग्रजीचा वापर केला जात असल्याने शासनाने हा मराठी सक्तीचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार यापुढे प्रत्येक विभागाकडून शंभर टक्के काम मराठीत करण अपेक्षित आहे. जे अधिकारी, कर्मचारी मराठी भाषेचा वापर करण्यास टाळाटाळ करतील त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.