Pune Police Crime Branch Arrest: सध्या केवळ महाराष्ट्राच नाही तर देशाबरोबरच परदेशामध्येही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एका आठवड्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही हा चित्रपट तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासूनच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावर रिल्स असो, पोस्ट असो किंवा कमेंट सेक्शन असो सगळीकडे केवळ 'छावा'चीच चर्चा आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये 'छावा'चे अगदी पहाटेचे शो सुद्धा हाऊसफूल असून 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त असलेल्या सुट्टीचाही फायदा झाल्याचं विश्लेषक सांगतात. मोठ्या संख्येनं चाहते थिएटरमध्ये येऊन हा चित्रपट पाहत आहेत. खास करुन महाराष्ट्रामध्ये चित्रपटाला विशेष मागणी असल्याचं दिसत आहे. हा चित्रपट जगभरामध्ये 500 कोटींची कमाई करेल अशी शक्यता ज्येष्ठ सिनेतज्ज्ञ तरण आदर्श यांनी व्यक्त केली आहे. 'छावा' चित्रपटाची क्रेझ आणि मागणी पाहता हा चित्रपट करमुक्त करण्याचीही मागणी केली जात आहे. हा चित्रपट पाहण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये फार उत्सुकता दिसून येत आहे. मात्र 'छावा' चित्रपट पाहण्याचा हाच उत्साह दोन आरोपींना महागात पडला आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. हा अगदी फिल्मी वाटावा असा प्रकार पुण्यात घडला आहे.
'छावा' चित्रपट बघण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हडपसर भागात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड असं अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. हे दोघेही दिघी येथील आदर्श नगरमधील शिव कॉलनीमध्ये राहतात. दोन्ही आरोपींवर यापूर्वी मकोका, तसेच एनडीपीएस कायद्याबरोबर शस्त्र कायद्याअन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या दोघांना थेट चित्रपटगृहामधून अटक करण्यात आली आहे. दोघेही चित्रपट पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आणि हे आरोपी आयतेच पोलिसांच्या जाळ्यात सापडले.