7 महिन्याच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल; न्यायमूर्ती म्हणाले 'हे तर...'

कोर्टाने दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणत आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. तसंच पीडितेच्या कुटुंबाला 10 लाखांची भरपाई देण्यास सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 19, 2025, 04:43 PM IST
7 महिन्याच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल; न्यायमूर्ती म्हणाले 'हे तर...'

कोलकातामधील विशेष कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. सात महिन्याच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने आरोपी राजीव घोष याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने हा गुन्हा म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. तसंच पीडितेच्या कुटुंबाला 10 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. 

30 नोव्हेंबर 2024 रोजी कोलकात्यातील बर्टोला परिसरात ही भयानक घटना घडली होती. मुलीचे पालक फूटपाथवर वास्तव्य करत होतं. आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी दिली होती. काही तासांनी त्यांना मुलगी फूटपाथवर रडताना आढळून आली. तिला गंभीर दुखापत झाली होती. वैद्यकीय तपासणीत जननेंद्रियाला दुखापत झाल्याचे उघड झाले. ज्यामुळे बलात्कार झाल्याचा संशय निर्माण झाला. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी राजीव घोष याची ओळख पटवण्यात आली. घटनेच्या काही दिवसांनी 4 डिसेंबरला पश्चिम बंगालच्या झारग्राम परिसरातून त्याला अटक करण्यात आली. 

पोलिसांनी योग्यप्रकारे तपास करत 26 दिवसांमध्ये कोर्टात चार्जशीट दाखल केली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आलं आणि वेगाने खटला चालवण्यात आला. 

17 फेब्रुवारी 2025 रोजी, न्यायालयाने राजीव घोषला POCSO कायद्याच्या कलम 6 (मुलावर लैंगिक अत्याचार) अंतर्गत दोषी ठरवलं. विशेष सरकारी वकील बिभास चॅटर्जी यांनी गुन्ह्याची क्रूरता आणि अर्भकाला झालेल्या गंभीर जखमांवर प्रकाश टाकत मृत्युदंडाची मागणी केली होती.

24 साक्षीदार आणि 7 वैद्यकीय तज्ज्ञांच्या साक्षीनंतर फिर्यादी पक्षाची बाजू मजबूत झाली. राजीव घोषला थेट गुन्ह्याशी जोडणारे डीएनए पुरावे तपासल्यानंतर कोर्टाचं समाधान झालं. याशिवाय तांत्रिक बाबीही तपासण्यात आल्या. ज्यामध्ये शरिरावीर चाव्याचे नमुने कोर्टासमोर सादर करण्यात आले. ज्यामुळे फिर्यादीच्या केसला आणखी बळ मिळाले. दरम्यान, पीडितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.