कझाकिस्तानध्ये मोठी दुर्घटना! प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू

कझाकिस्तानमधील अकातू विमानतळजवळ एक प्रवासी विमान कोसळलं आहे. दुर्घटनेत आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. 

शिवराज यादव | Updated: Dec 25, 2024, 04:49 PM IST
कझाकिस्तानध्ये मोठी दुर्घटना!  प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू

कझाकिस्तानमधील अकातू विमानतळजवळ एक प्रवासी विमान कोसळलं आहे. विमानात 67  प्रवासी होते. आतापर्यंत या दुर्घटनेत 42 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसंच 25 जणांना वाचवण्यात आलं आहे. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी या दुर्घटनेची माहिती दिली आहे. कझाकिस्तानच्या आणीबाणी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अजरबैजानचं विमान बाकू येथून ग्रोन्जीसाठी जात होतं. दुर्घटनेमागील कारणाचा उलगडा अद्याप झालेला नाही. दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आकाशातून विमान जमिनीच्या दिशेने जाताना दिसत आहे. लँडिगच्या तुलनेत विमानाचा वेग खूप होता हे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. 

ग्रोन्जी रशियाच्या चेचन्या परिसरात येतं. पण दाट धुकं असल्याने विमानाला ग्रोन्जीच्या दिशेने वळवण्यात आलं होतं. टेंगरीन्यूज पोर्टलने या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही ट्विटर हँडल्सवर विमानात एकूण 105 प्रवासी होते असा दावा केला जात आहे. यामध्ये अजरबैजानी आणि रशियन नागरिक होते. सोशल मीडियावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेतूल 10 प्रवासी वाचले आहेत. 

कझाकिस्तानमधील 52 अग्निशमन दलाचे जवान आणि 11 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरु आहे.