वर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ, अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरुस्त करून देतो म्हणत 50 हजारांची फसवणूक

कुणीतरी जादुटोणा करून तुमचा पाय खराब केलाय. आपल्या अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरूस्त करून देतोय. असा दावा वर्ध्यातील भोंदूबाबाने केलाय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 20, 2025, 01:10 PM IST
वर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ, अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरुस्त करून देतो म्हणत 50 हजारांची फसवणूक

Wardha Crime News : कुणीतरी जादुटोणा करून तुमचा पाय खराब केलाय, आपल्या अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरूस्त करून देतो, असा दावा वर्ध्यात भोंदूबाबाने केलाय. असा दावा करणाऱ्या भोंदूबाबाने वर्ध्यातील एका व्यक्तीची तब्बल 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना नुकतीच समोर आलीय. नळीच्या साहाय्याने शरीरातील अशुद्ध रक्त तोंडाने ओढण्याचा ढोंगी प्रयोग करत ही फसवणूक करण्यात आली आहे. वर्धा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केलीय. तर वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अशा भोंदूबाबापासून सावध राहण्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाने दिलाय. 

प्रत्येक घोटाला अडीच हजारांचा खर्च

वर्ध्याच्या सुदामपुरी येथील 65 वर्षीय प्रकाश शिंदे नामक व्यक्तीला दोन वर्षांपासून उजव्या पायाच्या गुडघ्याचा त्रास होत असल्याने त्यांना सेवाग्राम, नागपूर, यवतमाळ येथे उपचार करण्यात आले होते. परंतु, त्यांना आराम मिळाला नाही. दरम्यान घराजवळ आलेल्या अनोळखी इसमाने तुमच्या पायाची गुडघेदुःखी आपल्या  तपस्या करून मिळालेल्या अतेंद्रीय शक्तीने बरी करुन देतो असा दावा केला. प्रकाश शिंदे यांनी उपचार करण्यास नकार दिल्यावर देखील तो घरात आला आणि उपचार सुरू केला. पाणी, मंत्राचा कागद, प्लास्टिक नळी यातून त्याने उपचार सुरू केले. ढोंग करीत रबरी नळीने शरीरातून काढलेल्या अशुद्ध रक्ताच्या प्रत्येक घोटाचा खर्च अडीच हजार रुपये असल्याचे सांगून सत्तावीस घोट काढण्यात आले. उपचारानंतर तब्बल पन्नास हजार रुपये सदर व्यक्तीकडून उकडण्यात आले. पण उपचारानंतर आपण फसलो असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आल्यावर धावाधाव करण्यात आलीय. शिंदे यांच्या सूनेच्या सतर्कतेमुळे या भोंदूबाबाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

असं फुटलं भोंदूबाबाच्या टोळीचं बिंग

दुसऱ्यांदा पुन्हा तशाच प्रकारचा व्यक्ती घराजवळ आला आणि त्याने त्याच पद्धतीने प्रयोग करीत उपचार करण्याचा दावा केला. सोबत महिला देखील होत्या. यापूर्वीच फसवणूक झालेल्या प्रकाश शिंदे यांनी त्याला घरात घेत उपचाराची तयारी दाखवली आणि पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. फोनवर नातेवाईकही एकत्र झाले. पोलीस आणि जमलेल्या नातेवाईकांपुढे या अंतेद्रीय शक्ती असणाऱ्या भोंदू टोळीचे बिंग फुटले. पूर्वी पन्नास हजार रुपये घेऊन पसार झालेल्या भोंदूला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विदेशी चलनाच्या काही नोटा, बनावट औषध, वेगवेगळ्या तारखांचे आधारकार्ड जप्त केले आहेत. मेटलच्या पाईपच्या आधारे अशुद्ध रक्त बाहेर काढून एक ग्लास पाण्यात मंत्र वाचून हा उपचार करत असल्याचे तपासात पुढे आले असून तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे चमत्कारी मंत्र तंत्र करत उपचार करणाऱ्या भोंदूबाबापासून सावध राहण्याची गरज आहे.