'रोहित शर्माने स्वत:ला शिव्या देऊन...,' सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'हे फार काळासाठी...'

Champions Trophy: बांगलादेशविरोधातील सामन्यात रोहित शर्माने अत्यंत सोपा झेल सोडला आणि अक्षर पटेलची त्याच्या करिअरमधली पहिली हॅटट्ट्रीक चुकली.   

शिवराज यादव | Updated: Feb 20, 2025, 07:30 PM IST
'रोहित शर्माने स्वत:ला शिव्या देऊन...,' सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'हे फार काळासाठी...'

Champions Trophy: बांगलादेशविरोधातील सामन्यात रोहित शर्माने इतका सोपा झेल सोडला की तो स्वतावरच प्रचंड संतापला होता. झेल सोडल्यानंतर त्याने मैदानावर वारंवार हात आपटून आपली नाराजी जाहीर केली. तसंच गोलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलची हात जोडून माफी मागितली. किमान पुढील दोन ओव्हर रोहित शर्मा स्वत:लाच शिव्या घालत आपण इतकी मोठी घोडचूक कशी केली याबद्दल संताप व्यक्त करत होता. यानंतर समालोचकही उपहासात्मकपणे स्वत:ला शिव्या घालण्याबद्दल आयसीसीच्या नियमात काही शिक्षा आहे का? असं विचारत होते. क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूकडून झेल सुटणं ही सामान्य बाब आहे. पण रोहित शर्मा इतका वैतागला होता कारण त्याने हा कॅच पकडला असता तर अक्षर पटेलने करिअरमधील पहिली हॅट्ट्रीक मिळवली असती. 

जर अक्षर पटेलची हॅट्ट्रीक झाली असती तर कोणत्याही क्रिकेट प्रकारातील ही पहिली ठरली सती. आतापर्यंत चेतन शर्मा, कपिल देव, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या चार गोलंदाजांनीच एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेतली आहे. दरम्यान चॅम्पिअन्स ट्रॉफीत 2006 मध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेरोम टेलर यालाच हा पराक्रम करता आला आहे. त्यामुळे हा दुर्मिळ क्षण अक्षर पटेलच्या करिअरमध्ये येता येता राहिला. 

अक्षर पटेलने हॅट्ट्रीकसाठी योग्य चेंडू टाकला होता. त्याने जाकर अलीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. पण रोहित शर्मा ऐनवेळी अडखळला आणि हा सोपा झेल त्याच्या हातून सुटला. इतका सोपा झेल आपल्या हातून सुटल्यावर रोहित शर्माचाही विश्वास बसला नाही आणि त्याने संताप व्यक्त केला. 

भारताचे महान क्रिकेटर सुनील गावसकर यावेळी समालोचन करत होते. त्यांनी हॅट्ट्रीक होताना सुटलेला हा झेल फार काळासाठी लक्षात राहील असं सांगितलं. "झेल सोडणं हे होऊ शकतं, पण हॅट्ट्रीकचा झेल सोडणं हे फार काळत लक्षात राहणार आहे," असं ते म्हणाले.

दरम्यान रोहित शर्मा झेल सुटल्याने फार दुखावला होता. त्याला इतकं दोषी वाटत होतं की, इतरांनाही नंतर ते पाहून वाईट वाटू लागलं. तो सतत स्वत:वर ओरडत होता. "तो स्वत:ला शिव्या देत आहे. तो अजूनही नाराज आहे," असं गावसकर म्हणाले.