भिवंडीत राडा! विनयभंग प्रकरणातील आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक; व्हॅनच्या काचा फुटून...

Shocking News From Bhiwandi: पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आधी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता तिथे हा प्रकार घडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 22, 2025, 07:06 AM IST
भिवंडीत राडा! विनयभंग प्रकरणातील आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक; व्हॅनच्या काचा फुटून...
पोलिसांवर करण्यात आली दगडफेक

Shocking News From Bhiwandi: भिवंडी शहरात अल्पवयीन मुलीसह तिच्या आई-वडीलांना मारहाण केल्याप्रकरणी चौकशी करत असलेल्या पोलिसांवरच दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण व विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला आहेत. तसेच पोलीस खात्याच्या गाडीचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर स्थानिक जमावाने केलेल्या दगडफेकीनंतर या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेमकं घडलं काय?

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवी नगर येथील कामतघर या झोपडपट्टी परिसरात शेजाऱ्यांमध्ये मुलांचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून भांडण झालं. या भाडंणामध्ये आई-वडील व अल्पवयीन मुलीस मारहाण करण्यात आली. या वेळी घाबरून अल्पवयीन मुलीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अल्पवयीन मुलीस उपचारासाठी आय. जी. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलीस ठाण्यास मिळताच पोलीस आय. जी. एम. रुग्णालयात पोहोचले. त्यांनी अल्पवयीन मुलीचा जाबजबाब नोंदवला. याचवेळी या गुन्ह्यातील आरोपी हे वऱ्हाळ देवी नगर झोपडपट्टी येथे असल्याची माहिती समजल्याने पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार व सुनील शिंदे व तडवी नावाचे पोलीस शिपायाचा समावेश असलेलं पथक पोलीस जीप घेऊन घटनास्थळी आरोपींना पकडण्यासाठी गेले.

30 ते 40 जणांच्या जमावाकडून दगडफेक

पोलीस कारवाई करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले असता तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी या पोलीस पथकासोबत अरेरावीची भाषा वापरून त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा व आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता 30 ते 40 जणांच्या जमावाने पोलिसांवर व पोलिस वाहनावर दगडफेक करीत हल्ला चढवला. यामध्ये पोलीस शिपाई तडवी यांना दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. यावेळी जमावाने पोलीस जीपवर सुद्धा हल्ला चढवल्याने जीपचे नुकसान झाले आहे. सध्या पोलीस शिपाई तडवी यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल

नारपोली पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईकडून मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार यांनी सरकारी कामात अडथळा करून आरोपी पकडण्यास अटकाव करून हल्ला केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन उमेश गायकवाड, सचिन साठे, कृष्ण मंडल, नवीन उर्फ चिंट्या, शुभम परुळेकर, उमा वाघमारे, पंकज कांबळे व इतर 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.