Donald Trump Tariff War: अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर निर्णयांचा सपाटा लावलेल्या डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांनी आता आणखी एका निर्णयानं भारतासह संपूर्ण जगाला दणका देण्याची तयारी केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रावर 25 टक्के कर लावणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले असून, सेमीकंडक्टर चीप आणि औषधांवरही आयातशुल्क आकारला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळं जागतिक स्तरावर व्यापार क्षेत्रामध्ये या एका निर्णयामुळं अनेक बदल होतील हे आता स्पष्ट आहेच.
2 एप्रिलपासून ऑटोमोबाईलवरील करप्रणाली सुरू होणार असून, टॅरिफ शुल्कातून भारता कोणतीली विशेष सवलत दिली जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं. आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही यासंदर्भातील कल्पना दिली असल्याचं त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असतानाच आपल्याशी टॅरिफ मुद्द्यावर कोणीही वाद घालू शकत नाही असं सांगित आपण टॅरिफ शुल्क लावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. 'तुम्ही जितकं शुल्क आकाराल तितकंच शुल्क मी तुमच्याकडून आकारेन, असं मी म्हणालो. त्यावर मला ते आवडणार नाही, असं ते म्हणाले. तेव्हा तुम्ही जो कर लावाल तोच कर मीसुद्धा लावेन. किंबहुना मी प्रत्येक देशासोबतच असं करत आहे', असं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटल्याचं ट्रम्प यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप भारताच्या वतीनं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मात्र देण्यात आलेली नाही.
भारत हा सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांपैकी एक असून, त्यांच्याकडून कर स्वरुपात आकारली जाणारी रक्कम अधिक आहे. पण, मुळात हा व्यवसायाचा वेगळा मार्ग असून, भारतात विक्री क्षेत्रात अनेक आव्हानं येतात, कारण तिथं व्यापारासाठी फार अडचणी आहेत ही बाब ट्रम्प यांनी अधोरेखित केली.
आपल्याला भारताविषयी प्रचंड आदर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मी आदर करतो असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. याच वक्तव्यापुढं ते जे काही म्हणाले ते अनेकांच्याच भुवया उंचावणारं. भारतातील मतदानाच्या टक्केवारीचा उल्लेख करत इथं टक्केवारी जास्तच आहे, त्यामुळं 'मतदानाचा पर्यायी मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी आपण 2.1 कोटी अमेरिकन डॉलरची मदत का करावी? त्यांच्याकडे मुळातच खूप पैसे येतात', असंही ते म्हणाले.