वारंवार बसत असलेल्या धक्क्यांमुळे मी आता धक्काप्रुफ झाल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या फुटीपासून आतापर्यंत उद्धव ठाकरेंना बसणारे धक्के काही कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
जपानमध्ये एखाद्या दिवशी भुकंपाचा धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त होतं. त्याचप्रमाणे माझं झालं आहे. वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे मी धक्काप्रूफ झाल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. असे कोण किती धक्के देतंय ते बघूया. यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का ज्यावेळी असा देऊ की हेच पुन्हा दिसता कामा नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या फुटीपासून सुरू झालेले धक्के अद्याप थांबायचं नाव घेताना दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतरही अनेकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. अलीकडेच माजी आमदार राजन साळवी यांनीही ठाकरेंची साथ सोडली. जितेंद्र जनावळेसारखा निष्ठावंत शिवसैनिकही नुकताच पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे वारंवार बसणाऱ्या या धक्क्यांबाबत शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
तर महापालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे. सर्वांना दिलेली कामं सर्वांनी करा, शाखेनुसार काम करा असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे.
ज्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा होता तेव्हा त्यांनी वेळ दिला नाही.. आता त्याचा काही फायदा होणार नसल्याचं म्हणत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदें यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज्यभरातील अनेक नेते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून जात आहेत. अजूनही काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत. मात्र धक्काप्रूफ झाल्याचं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी आपण या सगळ्याला तयार असल्याचेच संकेत दिल्याचं पाहायला मिळत आहे.