24 वर्षांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा मोठा विजय, भारताचं WTC फायनलचं स्वप्न भंगणार?

 न्यूझीलंडने आधी बंगळुरू, मग पुणे आणि आता मुंबईत झालेला टेस्ट सामना जिंकून 3-0 ने आघाडी घेतली असून सीरिज नावावर केली आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 3, 2024, 01:41 PM IST
24 वर्षांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा मोठा विजय, भारताचं WTC फायनलचं स्वप्न भंगणार?
(Photo Credit : Social Media)

IND VS NZ 3rd  Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (india VS New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सिरीजचा तिसरा सामना मुंबईत पार पडला. या सामान्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने भारतावर 25 धावांनी विजय मिळवला असून यासह 24 वर्षांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाला (team india) व्हाईट वॉश मिळाला आहे. न्यूझीलंडने आधी बंगळुरू, मग पुणे आणि आता मुंबईत झालेला टेस्ट सामना जिंकून 3-0 ने आघाडी घेतली असून सीरिज नावावर केली आहे. 

24 वर्षांनी टीम इंडियाला घरच्या मैदानावर व्हाईट वॉश : 

24 वर्षात पहिल्यांदाच कोणत्याही संघाने टीम इंडियाला त्यांच्याच भूमीवर टेस्ट सीरिजमध्ये व्हाईटवॉश दिला आहे. यापूर्वो, 2000 साली खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 2-0 असा पराभव केला होता. आता 24 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतावर घरच्याच मैदानावर सीरिजमध्ये पराभूत होण्याची नामुष्की ओढवली आहे. 

मुंबई टेस्टमध्ये काय घडलं? 

बंगळुरू आणि पुणे टेस्टमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झालेली टीम इंडिया क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबई टेस्टमध्ये तरी विजयी होईल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. 1 नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी टीम इंडियाचा गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून न्यूझीलंडच्या 10 विकेट्स घेऊन त्यांना 235 धावांवर रोखलं. यात जडेजाने 5 विकेट्स घेतल्या.  मात्र फलंदाजीच्या पहिल्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा टीम इंडिया ढेपाळली आणि ऋषभ पंत (60), शुभमन गिल (90), वॉशिंग्टन सुंदर (38), यशस्वी (30) वगळता इतर कोणतेही फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. टीम इंडियाने यात 263 धावा केल्या आणि केवळ 28 धावांची आघाडी घेतली. 

न्यूझीलंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये देखील टीम इंडियाच्या गोलंदाजांनी विरुद्ध संघाला 174 वर 10 विकेट्स घेऊन रोखले. टीम इंडियाला विजयासाठी सोपं आव्हान होते, मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज फ्लॉप ठरले. रोहित शर्मा 11 तर विराट कोहली हा 1 धाव करून बाद झाला. ऋषभ पंत (64) वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही आणि भारताचा 25 धावांनी पराभव झाला. 

WTC फायनलचं स्वप्न भंगणार? 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 2025 मध्ये होणार असून त्याकरता क्वालिफाय होण्यासाठी टीम इंडियाला 6 पैकी 4 सामने जिंकणं महत्वाचं होतं. यात न्यूझीलंड विरुद्ध एक आणि नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा समावेश होता. मात्र न्यूझीलंड विरुद्ध तिसरा टेस्ट सामना गमावल्यावर भारताला आता WTC फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 पैकी 4 सामने जिंकावे लागणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवलं भारतासाठी तेवढं सोपं नसेल. आतापर्यंत बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड इत्यादीं विरुद्ध झालेलया टेस्ट सीरिज या भारतात खेळल्या गेल्या. मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे. विदेशात टेस्ट सीरिज जिंकण्याचा टीम इंडियाचा इतिहास फार चांगला नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी भारताची कसोटी लागणार आहे.