Ramdas Athavale On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत 120 हून अधिक जागा लढवल्या. ज्यात मनसेला यश आले नाही. काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे पालिका निवडणुकीत मनसे महायुतीसोबत असेल असे तर्क लढवले जात आहेत. दरम्यान महायुतीत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरेंसंदर्भात महत्वाचे विधान केलंय.
काल भारताने पाकिस्तानला हरवले त्याचप्रमाणे भारत पाकिस्तानला युद्धातही नेहमी हरवतो. पण आत्ता युद्धाची गरज नाही. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत द्यावा. त्यामुळे दोन्ही देशात मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील, असे आठवले म्हणाले.
एनडीएला बहुमत मिळाल्याने विरोधकांना बघवत नाही. दलित समाजाच्या मतामुळे महाराष्ट्रात महायुतीला फायदा झाला, असेही ते यावेळी म्हणाले. केंद्र सरकारने लव्ह जिहादचा कायदा करायचा असेल तर करा. लव्ह जिहादच्या कायद्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा नाही, असेही त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडे आणि राजीनामा द्यायचा की नाही हा अजित पवारांचा प्रश्न आहे. वाल्मीक कराड संतोष हत्येतील आरोपी आहे. पण धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाची थेट संबंध आहे असे दिसत नाही. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा की नाही हे ठरवावे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांची चांगली मैत्री आहे हे सत्य आहे. वाल्मीक कराड ने परळीत मोठा हैदोस घातला आहे हे सत्य असल्याचे आठवले म्हणाले.
संजय राऊत हे आरोप करण्यात एक्सपर्ट आहेत. त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. शिवसेना वाढवण्यात नीलम गोऱ्हे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे संजय राऊत यांना हे बोलण शोभत नाही. महिलांचा अपमान करणं योग्य नाही, असेही ते म्हणाले.
बेळगाव मधील भाग हा महाराष्ट्राचा आहे तो आम्हाला मिळायला हवा.मात्र कोर्टाचा जो निर्णय येईल तो सर्वांना मान्य असायला हवा.एसटी कर्मचाऱ्यांना अशी मारहाण किंवा काळे फासणे योग्य नाही.
त्या कृत्याचा आम्ही निषेध करतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांनी याबाबत लक्ष घालावे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यात संपर्क सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले.
राज उद्धव भेटीवर रामदास आठवलेंनी वक्तव्य केलं. राज आणि उद्धव ठाकरे कधीही एकत्र येणार नाहीत. त्यांनी कधी एकत्र येऊ नये. राज आणि उद्धव ठाकरे राजकारणात फेल झालेले नेते आहेत. दोन्ही नेते एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाला काही फरक पडणार नाही, असे म्हणत आठवलेंनी ठाकरे बंधुंना डिवचले.
राज ठाकरे महायुतीत आल्यास आम्हाला काही अडचण होणार नाही. लोकसभेला राज ठाकरे आमच्या सोबत होते. पूर्वी ते सर्व रंग घेऊन राजकारणात आले होते. त्यांचे स्वागत होते. पण आता भगवा घेऊन हिरव्याला विरोध करणे योग्य नाही, असे आठवले म्हणाले. राज ठाकरेना सोबत घेतले तर मुंबई महापालिकेत आपल्याला नुकसान होईल, अशी भाजपला माझी विनंती असल्याचे ते म्हणाले. मुंबईत उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना महायुतीत घेऊ नसे असे केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले.