Bill Gates on COVID-like pandemic : कोरोनानं संपूर्ण जगावर थैमान घातल्यानंतर आता कुठे ही विस्कटलेली घडी व्यवस्थित बसताना दिसत आहे, तोच आता आणखी एका महामारीचं सावट साऱ्या जगावर असल्याचा इशारा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे.
येत्या काळात जगावर कोविडसारख्याच महामारीचा हल्ला होणार असून, याची 10 ते 15 टक्के शक्यता असल्याचा इशारा देत पुढील 4 वर्षांमध्ये ही परिस्थिती ओढावणार असल्याचं गेट्स यांनी सूचित केलं आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या संपदकांना दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी हे वक्तव्य केलं जिथं त्यांनी या संकटाची 10 ते 15 टक्के शक्यता असल्याचं स्पष्ट करत पुढील 4 वर्षांमध्ये येणाऱ्या संकटाचे संकेत दिले. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीचा हल्ला होऊनही आणखी एका महामारीसाठी मात्र हे जग तयार नसल्याचं म्हणत गेट्स य़ांनी चिंतेचा सूर आळवला. भूतकाळात जे काही घडलं त्याहीपेक्षा भविष्यातील आव्हानासाठी आपण तयार असणं कधीही चांगलं. पण मुळात आपण त्या संकटासाठीच तयार नाही आहोत, असं ते म्हणाले.
भविष्यात येणाऱ्या महामारीसाठी जग अजिबातच तयार नसून, येणाऱ्या पुरेशी तयारी करण्याऐवजी सर्वजण भूतकाळाच झालेल्या चुका आणि उणिवांवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लावताना दिसत आहेत. इशी शब्दांत गेट्स यांनी समाजाच्या एकंदर विचारसणी आणि गंभीर मुद्द्यांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर टीका केली. लाखोंच्या संख्येनं जीव गमावूनही चुकांमधून शिकण्याऐवजी त्याच चुकांची पुनरावृत्ती होत असल्याचा नाराजीचा तीव्र सूर त्यांनी आळवला.
2015 मधील टेड टॉक्स कार्यक्रमादरम्यान बिल गेट्स यांनी हे जग एका महामारासाठी तयारच नाही असं म्हणत चिंतेचा सूर आळवला होता. 2019 मध्ये कोविडच्या लाटेनं त्यांनी दिलेले हे संकेत प्रत्यक्षरुपात पाहता आले आणि सारं जग संकटात आलं. जागतिक आरोग्य क्षेत्र आणि सुविधांमध्ये कशा प्रकारे क्रांती येण्याची गरज आहे याचाच पुनरुच्चार त्यांनी 2022 मध्येही केला. ज्यानंतर आता पुन्हा एकदा गेट्स यांनी आणखी एका महामारीसाठी जगाला सतर्क केलं असून, आरोग्य यंत्रणांनी आतापासूनच सज्ज व्हावं असाच स्पष्ट इशारा दिला.