कपील शर्माचं आणखी एक अनधिकृत बांधकाम

कॉमेडीयन कपील शर्माचा अनधिकृत बांधकामाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.

Updated: Sep 11, 2016, 11:44 PM IST
कपील शर्माचं आणखी एक अनधिकृत बांधकाम

मुंबई : कॉमेडीयन कपील शर्माचा अनधिकृत बांधकामाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. गोरेगावमधील डीएलएच एन्क्लेव्ह इमारतीतील पार्किंगची जागा निवासीसाठी वापरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकट्या कपीलनंच नव्हे तर या इमारतीतील सोळा फ्लॅटधारकांनी पार्किंगचा वापर निवासी वापरासाठी केला आहे. त्यांना महापालिकेनं नोटीस बजावली असून गणेशोत्सवानंतर या सोळाजणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. 

या सर्व फ्लॅटधारकांनी इमारतीत अंतर्गत बदल केले असून पंचनामा झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.एस. दोंदे यांनी दिली. 

या इमारतीतील फ्लॅट क्रमांक ४,५,९,१२ आणि १६ विकण्यात आलेत. त्यात कपील शर्माचा फ्लॅट क्रमांक ९ आहे. या सर्व फ्लॅटधारकांना नोटीसा बजावण्यात आल्यात. तसंच बाकी फ्लॅट विकण्यात आलेले नसले तरी त्यातही अंतर्गत बदल करुन पार्किंगची जागा हडप करण्यात आल्याने डीएलएच बिल्डरला नोटीस बजावण्यात आली आहे. 

या इमारतींविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. पोलिसांनी पंचनामा करुन या सोळा फ्लॅटधारकांविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर या इमारतीतील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार आहे.