आमदारांच्या विकास निधीत वाढ, तर पीए आणि ड्रायव्हरचाही झाला 'असा' विकास

आमदारांच्या विकासनिधीत घसघशीत वाढ, तर आमदारांच्या पीए आणि ड्रायव्हरच्या पगारातही इतकी वाढ

Updated: Mar 16, 2022, 06:13 PM IST
आमदारांच्या विकास निधीत वाढ, तर पीए आणि ड्रायव्हरचाही झाला 'असा' विकास

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाषण केलं. आपल्या भाषणात अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं. केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते. मला कळत नाही यांना 'येड पांघरूण पेडगावला जायचं होतं' की त्यांचा 'अभ्यास कमी होता' म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लगावला.

अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी 'सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे, या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली. राज्य अडचणीतून पुढे जात असताना राज्याला कर्जातून बाहेर काढताना महसूली तुट कशी कमी करता येईल, नागरीकांवर कराचा भार पडता कामा नये व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांची मोठी घोषणा
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांना 5 कोटीचा विकास निधी तर आमदारांच्या चालकाला 20 हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला 30 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. 

राज्यातील आमदारांचा विकास निधी आता चार कोटी रुपयांवर पाच कोटी इतका झाला आहे.  त्यामुळे आमदाराला त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच कोटींचा निधी मिळणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या विकास निधीत दोन वर्ष वाढ करण्यात आली नव्हती. 

पीए आणि ड्रायव्हरचा पगार वाढला
आमदारांचे पीए आणि ड्रायव्हरच्या पगारातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रायव्हरचा पगार 15 हजारावरुन वीस रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यात आला आहे.