जरांगेंना मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही: 'वेळ दिला, पुरावे दिले तरी आरक्षण नाही; आता आम्हाला समितीच मान्य नाही!'

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आकाश नेटके | Updated: Oct 27, 2023, 12:06 PM IST
जरांगेंना मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही: 'वेळ दिला, पुरावे दिले तरी आरक्षण नाही; आता आम्हाला समितीच मान्य नाही!'

Maratha Reservation : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला (Maratha Aarakshan) 50 टक्क्यांच्या आत ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. आज या उपोषणाचा तिसदा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शिर्डी दौऱ्यावर आले असतानाही मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका न घेतल्याने जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच सरकारकडे वेळ आहे, पुरावे आहेत, तरी आरक्षण देत नाहीत. कुणाला विचारून समितीला वेळ वाढवून दिला. आता आम्हाला समिती मान्य नाही, असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

"मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण पंतप्रधानांना मराठा आरक्षणाबाबत व आंदोलनाबाबत सांगितलं नाही अशी शंका आहे. जर त्यांनी सांगितलं असेल, तर पंतप्रधानच जाणूनबुजून काल त्यावर काही बोलले नाहीत का? पंतप्रधानांना गोरगरीबांची गरज राहिली नाही, असा अर्थ महाराष्ट्रातील जनता आता काढायला लागली आहे," असे जरांगे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं - मनोज जरांगे पाटील

"काल पंतप्रधानांनी मराठा आरक्षणाचा कोणताही विषय घेतला नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांना सांगितले नाही. जर सांगितले असेल तर त्यांनी जाणूनबुजून हा विषय त्यांच्या बोलण्यात घेतला नाही अशी शंका मराठा समाजामध्ये आहे. पंतप्रधानांना आता गोरगरिबांची गरज राहिली नाही असा अर्थ त्यातून काढण्यात येत आहे. मराठा समाजाला वाटलं होतं पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि सरकारला यातून मार्ग काढण्यास सांगतील. कारण मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांविषयी पाप नव्हतं. जर वाईट भावना असती तर त्यांचे विमानसुद्धा उतरू दिले नसते. सरकारने 50 वर्षे देता असं सांगायला पाहिजे होतं. कारण सरकारला वाटतं की गोरगरिब मराठ्यांचे चांगले होऊ नये. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोठं षडयंत्र रचलं आहे, असा गंभीर आरोपी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

"तुम्ही मराठ्यांचा ओबीसीत समावेश का करत नाही? मराठा समाजाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला पाहिजे यासाठीच तुम्ही आरक्षण देत नाही आहात. सगळ्या गोष्टी तुमच्या अंगलट आल्या आहेत. पुरावे मिळूनही आरक्षण देत नाही, त्यामुळे तेही तुमच्या अंगलट आलंय. तुम्हाला नाक नसल्यासारखं झालंय. तुम्ही मागाल ते मराठ्यांनी दिलं आहे," असंही जरांगे पाटील म्हणाले.