Pulwama attack : पुलवामा शहिदांच्या कुटुंबीयांना आजही प्रतीक्षा आश्वासन पूर्ततेची

त्या घोषणा फक्त कागदोपत्रीच...

Updated: Feb 14, 2020, 11:55 AM IST
Pulwama attack : पुलवामा शहिदांच्या कुटुंबीयांना आजही प्रतीक्षा आश्वासन पूर्ततेची
पुलवामा हल्ला

नवी दिल्ली : सीआरपीएफ CRPF जवानांच्या बसच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी २०१९, म्हणजेच वर्षभरापूर्वी एक आत्मघाती हल्ला करण्यात आला. जम्मू -काश्मीरमधील श्रीनगर जम्मू महामार्गावर येणाऱ्या पुलवामा PULWAMA जिल्ह्यात हा भयावह हल्ला करण्यात आला. एका कारमध्ये स्फोटकं ठेवून घडवण्यात आलेल्या या आत्मघाती हल्ल्यात ४० जवानांना प्राण गमवावे  लागले.

पाकिस्तानमधून सक्रिय असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली होती. ज्यामध्ये आदिल अहमद याने या स्फोट घडवून आणल्याची माहिती उघड झाली. २०१८ मध्येच आदिलने जैशशी हातमिळवणी केली होती. 

पुलवामा हल्ल्याला बरोबर एक वर्ष होऊनही या जखमा आजही तितक्याच ताज्या असून तितक्याच वेदनादायकही ठरत आहेत. पण, शासनदरबारी मात्र या बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा विसर पडल्याचं निराशाजनक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ज्या कुटुंबांनी त्यांचे आधार गमावले ते आजही शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या मदतीच्या स्वरुपात हा आधार शोधत आहेत. पण, त्यांच्या हाती मात्र निराशाच लागल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे. 

'डीएनए'च्या वृत्तातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार शहिदांच्या कुटुंबीयांना घोषित करण्यात आलेली मदत ही बऱ्याच अंशी फक्त कागदोपत्रीच राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

रोहिताश लांबा (राजस्थान) 

राजस्थानच्या शहापूरा येथील गोविंदपूरा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या रोहिताश लांबा यांनी पुलवामा हल्ल्यात प्राण गमावले होते. दोन वर्षांपूर्वीच ते या निमलष्करी दलाचा भाग झाले होते. हल्ल्याच्या क्षणापासून साधारण वर्षभरापूर्वीच ते विवाहबद्ध झाले होते. लांबा यांचं निधन झालं तेव्हा अवघ्या दोन वर्षांचं निरागस बाळ ते मागे ठेवून गेले. त्यांचा हा मुलगा आज एक वर्षाचा आहे.

लांबा यांच्या आठवणीच सध्या त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. कारण, त्यांच्या निधनापश्चात सरकारकडून जाहीर करण्यात आलेली सारी मदत ही कागदोपत्रीच रेंगाळली आहे. 

लांबा यांच्या मूळ गावी असणाऱ्या शाळेला त्यांचं नाव देऊ करु, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरी देऊ असं जाहीर करण्यात आलं होतं. पण, आता मात्र कुटुंबीयांनाही या मदतीच्या आशा धुसर झाल्याचा अंदाज आला आहे.

वर्षभर सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारुन कुटुंबीयांनी आता यापुढे हात टेकले आहेत. त्यांची पत्नीही या परिस्थितीपुढे वारंवार फक्त आसवं गाळत आहे. 

कुटुंबाला आर्थिक स्वरुपात मदत मिळाली असली तरीही रोहिताश लांबा यांच्या स्मरणार्थ ज्या गोष्टी होणं अपेक्षित होतं त्या झाल्या नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची नाराजी आहे. पैसा आज आहे, उद्या नाही पण लांबा यांच्या बलिदानाचं स्मरण येणाऱ्या नव्या पिढीला कायम रहावं अशीच त्यांची अपेक्षा आहे.

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

जीत राम गुर्जर  (राजस्थान)

राजस्थानच्या भरतपूर येतील जीत राम गुर्जर या शहिदांच्या कुटुंबाचीही काहीशी अशीच व्यथा. जीत राम यांच्या आईला त्यांच्या बलिदानाची आठवण आहे, किंबहुना मुलाचा प्रचंड अभिमान आहे. पण, या अभिमानामुळे किमान गुर्जर यांच्या कुटुंबाचं तरी पोट भरलं जात नाही. 

पत्नी, दोन मुलं, आई-वडील आणि लहान भाऊ अशा कुटुंबाचा आधार असणारे जीत राम गुर्जर यांच्या निधनापश्चात त्यांचं कुटुंब आजही त्यांना दिल्या जाणाऱ्या सन्मानाच्या प्रतिक्षेत आहे. त्यांच्या कुटुंबाला देण्यात आलेलं नोकरीचं आश्वासन अद्यापही पूर्ण करण्यात आलेलं नाही. शिवाय त्यांचं बलिदान स्मरणात राहण्यासाठी एक स्मारक उभारण्याचीही घोषणा करण्यात आली होती. पण, आता मात्र कुटुंबानेच पुढाकार घेत स्मारक उभारण्यासाठीती तयारी दाखवली आहे. 

शासन, राजकीय नेते, विविध मंत्रीमहोदय यांच्याकडून करण्यात आलेल्या घोषणा, आश्वासनं ही कालांतराने हवेत विरली आणि मागे राहिल्या त्या फक्त अपेक्षा आणि निराशेची झळ देणाऱ्या काही घटना.