प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतील ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण सायंकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वीज वापरल्यास या योजनेतील ग्राहकांना वीज बिल भरावे लागणार आहे. असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिलाय. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर
केंद्र सरकराने 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचं वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत देशातील अनेक घरांवर सौरयंत्रणा बसवण्यात आली. सोलरमुळे आपलं वीजबिल शून्यावर येईल या आनंदात असणाऱ्या ग्राहकांना आता मोठा झटका बसलाय. कारण ग्राहकांना संध्याकाळी 6 ते सकाळी 9 यावेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारले जाणार आहे. असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिलाय.
'पंतप्रधान सूर्यघरला'ही बिलाचा शॉक
संध्याकाळी 6 ते सकाळी 9 यावेळेत वीज वापरल्यास विजेवर बिल आकारण्याचा प्रस्ताव. राज्यातील 1 लाखांवर वीजग्राहकांच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसविण्यात आले आहेत. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य. तर अतिरिक्त वीज महावितरणला पाठवून उत्पन्नही मिळतं. पॅनल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात आलं होतं.
महावितरणने वीज नियामक आयोगाला विजबिलाचा प्रस्ताव दिलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्ज काढून घरावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसविलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीजबिल, असा दुहेरी झटका ग्राहकांना बसणार आहे.
छतावर सौरऊर्जानिर्मिती पॅनल्स बसविण्यात आलेले कुठे किती ग्राहक?
नागपूर - 16, 949 ग्राहक
पुणे- 7, 931
जळगाव- 7, 514
छ. संभाजीनगर- 7, 008
नाशिक- 6, 626
अमरावती- 5, 795
कोल्हापूर- 5, 024
आपल्याला शून्य रुपये विजबिल येणार म्हणून आनंदीत असणाऱ्या ग्राहकांच्या आनंदावर या प्रस्तावामुळे विरझण पडणार आहे. त्यामुळे आता महावितरणच्या या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जातोय. हे लवकरच स्पष्ट होईल.