ICC Rankingच्या टॉप 10मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही!

आयसीसी टी-20 वर्ल्डकपवर यंदा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने कब्जा केला. इतकंच नाही तर आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीतही कांगारूंच्या खेळाडूंनी अग्रस्थान पटकावलं आहे. 

Updated: Nov 18, 2021, 07:57 AM IST
ICC Rankingच्या टॉप 10मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही!

मुंबई : आयसीसी टी-20 वर्ल्डकपवर यंदा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने कब्जा केला. इतकंच नाही तर आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीतही कांगारूंच्या खेळाडूंनी अग्रस्थान पटकावलं आहे. याचा सर्वात मोठा धक्का भारतीय गोलंदाजांना बसला आहे. कारण टॉप 10मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाहीये. ज्या खेळाडूंनी दुबईमध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यांच्या आयसीसीच्या यादीत चांगला फायदा झाल्याचं समोर आलं आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जबरदस्त झेप घेतली आहे. T-20 वर्ल्डकप स्पर्धेत झम्पा, जोश हेझलवूड आणि मिचेल मार्श यांनी ICC क्रमवारीत लक्षणीय प्रगती केली. झम्पाने इंग्लंडच्या आदिल रशीद आणि अफगाणिस्तानच्या राशिद खानला मागे टाकलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या T-20 वर्ल्डकपच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने चांगली कामगिरी केली. त्याने डेथ ओव्हर्समध्ये विरोधी संघाच्या धावाही होऊ दिल्या नाहीत. हेझलवूडने अंतिम सामन्यात 16 धावांत तीन विकेट घेतल्या आणि संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियासाठी 11 बळी घेतले. 

फलंदाजीमध्ये डेवॉन कॉनवेची बढती

फलंदाजांच्या क्रमवारीतही अनेक बदल झाले आहेत. अबुधाबीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडसाठी डेवॉन कॉनवेच्या शानदार खेळीमुळे तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने अंतिम सामन्यात 50 चेंडूत नाबाद 77 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम

ICC T-20 फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर भारताचा केएल राहुल घसरला असून तो सहाव्या स्थानावर आहे. यासह विराट कोहली आठव्या स्थानावर कायम आहे.