मोडकसागर धरणात 9 कोटींचं ‘लेक टॅपिंग’!

मुंबई महापालिका आज मोडकसागरमध्ये लेक टॅपिंग करणार आहे. या लेक टॅपिंगमुळं कार्यरत होणाऱ्या बोगद्यामुळं पाणीटंचाईच्या काळात धरणातील मृतसाठाही वापरता येणं शक्य होणार आहे. या प्रयोगावर नऊ कोटी रुपये खर्च होतोय. 

Updated: Sep 3, 2014, 11:39 AM IST
मोडकसागर धरणात 9 कोटींचं ‘लेक टॅपिंग’!

मुंबई : मुंबई महापालिका आज मोडकसागरमध्ये लेक टॅपिंग करणार आहे. या लेक टॅपिंगमुळं कार्यरत होणाऱ्या बोगद्यामुळं पाणीटंचाईच्या काळात धरणातील मृतसाठाही वापरता येणं शक्य होणार आहे. या प्रयोगावर नऊ कोटी रुपये खर्च होतोय. 

लेक टॅपिंगमुळे पाऊस महिनाभर लांबला तरी मुंबईत पाणीकपात करण्याची वेळ भासणार नाही तसंच मुंबईची पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून जादा पाणीपुरवठा करणंही शक्य होईल, असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात येतंय. याआधी, कोयना धरणात अशा प्रकारचा प्रयोग पार पडला होता.

लेक टॅपिंग म्हणजे काय?
लेक टॅपिंग म्हणजे, पाण्याच्या साठ्याखाली धरणाला सुरुंगाद्वारे विहिरीएव्हढं खोल छिद्र पाडणं... आज, मोडकसागर धरणातला तीन मीटरचा दगड सुरुंगाच्या साहाय्यानं फोडण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेनं तलावाशेजारील टेकडीवर बांधलेला जलबोगदा तलावाशी संलग्न होईल. त्यामुळे, मुंबईकरांना जास्त पाणी पुरवठा शक्य होईल. 

मोडकसागर तलावाच्या भूमिगत शाफ्टच्या खाली १९३ मीटर लांबीचा आणि ३.२ व्यासाचा टनेल बनविण्यात आलाय. जवळपास आठ-नऊ महिने हे टनेलचं काम सुरू होतं. या टनेलखालून स्फोट केला जाईल. स्फोट केल्यानंतर २० मीटर प्रति सेकंद वेगाने टनेलमध्ये तलावातील पाण्याचा प्रवेश होईल. हे पाणी १० ते १५ सेकंदाने टनेलच्या बाहेर पडेल. स्फोटासाठी डिले डिटोनेटर्सचा वापर करावा लागणार असून फक्त दोन सेकंदाचा स्फोट होणार आहे. त्यानंतर टनेलच्या आतून बाहेरून वेगवेगळ्या बाजूने आठ वेळा हे स्फोट सुरू राहणार आहेत. या स्फोटाचा बाह्य वातावरणावर कोणताही परिणाम होत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.