अदानींने 2024 मध्ये भरलेल्या टॅक्सचा आकडा पाहून 'हा आकडा वाचायचा कसा?' असा प्रश्न पडेल

Adani Group Toatal Tax Payment: अदानी समुहानेच यासंदर्भातील सविस्तर आकडेवारी जारी केली आहे. ही आकडेवारी का जारी करत आहोत हे ही त्यांनी स्पष्ट केलंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 24, 2025, 01:40 PM IST
अदानींने 2024 मध्ये भरलेल्या टॅक्सचा आकडा पाहून 'हा आकडा वाचायचा कसा?' असा प्रश्न पडेल
अदानी समुहानेच जारी केली आकडेवारी (प्रातिनिधिक फोटो)

Adani Group Toatal Tax Payment: अदानी समुहाने आर्थिक वर्षात नेमका किती कर भरला यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे या आकडेवारीमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत अदानी समुहाने भरलेल्या कराच्या रक्कमेमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भातील आकडेवारी अदानी समुहानेच जारी केली असून देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहांपैकी एक असलेल्या या अदानींच्या कंपन्यांनी भरलेल्या कराचा आकडा नेमका वाचावा कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

नेमका किती कर भरलाय अदानी समुहाने?

अदानी समुहाने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारकडे आर्थिक वर्ष 2024 मध्ये जमा केलेल्या कराची एकूण रक्कम 581040000000 रुपये इतकी आहे. वेगवेगळ्या माध्यमातून भरलेल्या एकूण कराची अगदी अचूक रक्कम 58 हजार 104.4 कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम आर्थिक वर्ष 2023-24 च्या कालावधीत सरकारकडे जमा करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच रक्कम 46,610.2 कोटी रुपये इतकी होती. या रक्कमेमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 25 टक्के वाढ झाल्याचं दिसत आहे, असं अदानी समुहाने म्हटलंय.

कोणकोणत्या कंपन्या आहेत अदानी समुहामध्ये?

अदानी समुहाअंतर्गत येणाऱ्या प्रमुख सात कंपन्यांच्या माध्यमातून हा कर जमा करण्यात आला आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड, अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स लिमिटेड अशा सात कंपन्यांचा यात समावेश आहे. अदानी समुहाअंतर्गत येणाऱ्या एनडीटीव्ही लिमिटेड, एसीसी लिमिटेड आणि संघी इंड्स्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांनी भरलेला कराच्या रकमेचा यामध्ये समावेश आहे.

...म्हणून जाहीर केली आकडेवारी

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यासंदर्भात म्हणाले की, "पारदर्शकता हा विश्वासाचा पाया असून शाश्वत वाढीसाठी विश्वास आवश्यक आहे. आम्ही आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत असलेला प्रत्येक रुपया पारदर्शकता आणि सुशासनासाठी असून आमची वचनबद्धता यामधून दिसते. स्वेच्छेने हे अहवाल लोकांसमोर सादर करून, आम्ही अधिकाधिक भागधारकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आकडेवारी उघड करण्याच्या माध्यमातून आम्ही एक जबाबदार कॉर्पोरेट कंपनी म्हणून नवीन बेंचमार्क सेट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत आहोत."

आपल्या कंपन्यांच्या व्यवहारांबद्दल पारदर्शकता असल्याचं अधोरेखित करण्याबरोबरच स्टेकहोल्डरचा विश्वास वाढवणे आणि अधिक जबाबदार कर प्रणालीमध्ये योगदान देण्याचा अदानी समुहाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं आहे.