दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीचा नवा मास्टर प्लान!
केप टाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या तिसऱ्या वनडेला केप टाऊनमध्ये सुरुवात झाली आहे. ६ मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-०नं आघाडीवर आहे. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये धोनीला बॅटिंगची संधी मिळाली नाही. पण विकेट कीपिंग करताना धोनी टीमच्या मदतीला येत आहे.
धोनीला नेटमध्ये सराव करताना कमी पाहायला मिळतं. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं विकेट कीपिंगचा सराव केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या दुष्काळसदृष्यं परिस्थिती आहे. त्यामुळे खेळपट्टीला कमी पाणी दिलं जात आहे. कमी पाणी मिळाल्यामुळे खेळपट्टीमध्येही बदल झाले आहेत. अशा खेळपट्टीवर बॅट्समन पुढे येऊन खेळत असेल तर स्टम्पिंगसाठी धोनीची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे धोनी विकेट कीपिंगचा सराव करतोय.
धोनीच्या विकेट कीपिंगच्या सरावासाठी दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक स्पिनरना धोनीसमोर बॉलिंगही टाकायला सांगण्यात आलं होतं.
तर भारत इतिहास घडवणार
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत ३-०ची आघाडी घेऊन इतिहास घडवण्याची सूवर्णसंधी विराट ब्रिगेडकडे असणार आहे. डरबनच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेट्सनं तर सेंच्युरिअनमधल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं दणदणीत विजय झाला होता. याआधी फक्त दोनच वेळा १९९२-९३ आणि २०१०-११मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच जमिनीवर एका सीरिजमधल्या दोन वनडे जिंकल्या होत्या. दोन वनडे जिंकल्या तरी सीरिज मात्र भारताला गमवावी लागली होती.
केप टाऊनमध्ये होणारी तिसरी वनडे भारत जिंकला तर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याच विरुद्ध तीन वनडे जिंकण्याचं रेकॉर्ड भारत करेल. भारतला ही संधी चालून आलेली असतानाच दक्षिण आफ्रिकेला मात्र दुखापतीनं ग्रासलं आहे. एबी डिव्हिलियर्स, फॅप डुप्लेसिस आणि क्विंटन डीकॉक या तिन्ही खेळाडूंना दुखापतीमुळे खेळता येणार नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीचा नवा मास्टर प्लान!

भारत-दक्षिण आफ्रिका तिसरी वनडे
धोनीचा मास्टर प्लान
म्हणून धोनीनं केला कीपिंगचा सराव