पाकिस्तानमध्ये आयपीएलच्या प्रसारणावर बंदी
इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली. भारताने पाकिस्तामध्ये खेळाला नुकसान पोहोचवण्यासाठी संघटित प्रयत्न केल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.
'भारताने पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान करण्याचा संघटित प्रयत्न भारताने केला आहे, त्यामुळे भारतातल्या स्थानिक स्पर्धेचा प्रसार करायला परवानगी देण्यात काहीही अर्थ नाही,' असं फवाद चौधरी म्हणाले.
'पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट लीगचं नुकसान करण्यासाठी अधिकृत प्रसारणकर्ते डी स्पोर्ट्स यांनी चौथ्या मोसमात मधूनच माघार घेतली', असं वक्तव्य फवाद चौधरी यांनी केलं. पुलवामा हल्ल्यानंतर पीएसएलचं प्रसारण करणाऱ्या आयएमजी रिलायन्सने जगभरात पीएसएल न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला स्पर्धेदरम्यान नवीन प्रॉडक्शन कंपनी शोधावी लागली होती.
'आयपीएलच्या कोणत्याही मॅचचं प्रसारण पाकिस्तानमध्ये होणार नाही याची काळजी पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरण घेईल. खेळ आणि संस्कृतीचं राजकारण करता कामा नये, असं आमचं मत आहे, पण भारताने पाकिस्तानचे खेळाडू आणि कलाकारांबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे,' अशी प्रतिक्रिया फवाद चौधरी यांनी दिली.
पाकिस्तानमध्ये आयपीएलच्या प्रसारणावर बंदी
