'पायरेटड' पीके पाहून मुख्यमंत्र्यांनी 'डाऊनलोड' केला वाद!
उत्तरप्रदेश : प्रदर्शनापूर्वीपासून ते प्रदर्शनानंतरही वादात सापडलेला सिनेमा 'पीके' पुन्हा एकदा चर्चेत आलाय... पहिल्यापासूनच 'वादाचा' हात हातात घेतलेल्या 'पीके'च्या नव्या वादात आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवही अडकलेत.
अखिलेश यादव यांचं बॉलिवूड प्रेम आता त्यांच्यावर भारी पडताना दिसतोय. अखिलेश यादव यांना नवा कोरा आणि वादग्रस्त सिनेमा 'पीके' पाहण्याचा मोह टाळता आला नाही... मग काय त्यांनी इंटरनेट सुरू करून हा सिनेमा डाऊनलोड केला... आणि पाहिला.
महत्त्वाचं म्हणजे, 'पीके' या सिनेमाचा ऑफिशिअल व्हिडिओच अजून इंटरनेटवर आलेला नाही. याचाच अर्थ, अखिलेश यादव यांनी या सिनेमाची पायरेटेड कॉपी इंटरनेटवरून डाऊनलोड करून पाहिलीय.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अनधिकृतरित्या एका वेबसाईटवरून 'पीके' सिनेमा डाऊनलोड करून पाहिलाय, त्यांनी कॉपीराईट कायद्याचं आणि माहिती-तंत्रज्ञान अधिनियमांचं उल्लंघन केलंय... असा आरोप 'तहरीर' एका स्थानिक स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष संजय शर्मा यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांविरोधात खटला दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केलीय.
महत्त्वाचं म्हणजे, एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना खुद्द अखिलेश यादव यांनी अनावधानानं आपण पीके सिनेमा इंटरनेटवरून डाऊनलोड करून पाहिल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. 'अनेक लोकांनी मला पीके सिनेमा पाहण्याचा आग्रह केला होता... काही दिवसांपूर्वी मी हा सिनेमा डाऊनलोड केला होता. पण, हा सिनेमा पाहण्याची संधी मला काल रात्री 10 वाजता मिळाली. या सिनेमात एक संदेश आहे... आणि जास्तीत जास्त लोकांनी हा सिनेमा पाहायला हवा... यामुळे, मी स्वत: हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतलाय' असं अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं.
उल्लेखनीय म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर उत्तरप्रदेशात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
'पायरेटड' पीके पाहून मुख्यमंत्र्यांनी 'डाऊनलोड' केला वाद!
