दोन जणांना अशोकचक्र, तर ३ कीर्तिचक्र जाहीर

नवी दिल्ली : राजपथवर दोन शहीद अधिकाऱ्यांना अशोकचक्र तर तीन जणांना कीर्तीचक्र पुरस्कार देण्यात आला.

जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल नाईक नीरजकुमार सिंह यांचा अशोकचक्र देऊन मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे. 

शांतता काळात दाखविलेल्या शौर्याबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. याशिवाय, १५ ऑगस्ट २०१४ ला मेजर मुकुंद वरदराजन यांना मरणोत्तर जाहीर झालेले अशोकचक्रही उद्या प्रदान करण्यात येणार आहे. 

याशिवाय, तीन जणांना मरणोत्तर कीर्तिचक्र आणि नऊ जणांना शौर्यचक्र प्राप्त झाले आहे. या बारा जणांमध्ये उरी सेक्‍टरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार यांचाही समावेश आहे. 

२४ ऑगस्ट २०१४ ला जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एका शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी नीरजकुमार यांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात एका जवानाला गोळी लागली. त्याला सुरक्षित परत आणण्यासाठी नीरजकुमार हे आपल्या जिवाची पर्वा न करता पुढे गेले. 

एका दहशतवाद्याने त्यांच्यावर बॉंब टाकला व तुफान गोळीबार केला, तेव्हा अत्यंत धाडसीपणाने पुढे जात त्यांनी त्या दहशतवाद्याला ठार मारले. याच वेळी दुसऱ्या दहशतवाद्याने नीरजकुमार यांच्यावर हल्ला करत त्यांच्या छातीवर गोळी मारली. 

अंगावर मोठ्या प्रमाणावर जखमा होऊनही नीरजकुमार यांनी अतुलनीय साहस दाखवत त्या दहशतवाद्याजवळची रायफल ओढून घेतली आणि त्याला हाणामारीत ठार मारले. बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी आपली जागाही सोडली नाही. मात्र, नंतर रुग्णालयात नेताना ते हुतात्मा झाले. 

कॅप्टन जयदेव, नायब सुभेदार कोश बहादूर गुरंग आणि सुभेदार अजय वर्धन यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहेत. एकूण नऊ जणांना शौर्यचक्र प्रदान करण्यात येणार आहे. 

लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार (मरणोत्तर), मेजर मुकुल शर्मा, मेजर अभिजय (मरणोत्तर), मेजर आशुतोष कुमार पांडे, मेजर आर. वंशिकृष्णन, मेजर बिभांषू धोंडियाल, मेजर स्वरूपकुमार घोराय, पॅराट्रूपर बलविंदरसिंग (मरणोत्तर) आणि रायफलमन मंगाराम यांना शौर्यचक्र मिळाले आहे. 

तसेच, वायुसेनेतील 83 जणांना राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. यामध्ये सहा जणांना परम विशिष्ट सेवा पदक, पंधरा जणांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Major Mukund Varadarajan, Naik Neeraj Kumar awarded Ashoka Chakra posthumously
News Source: 
Home Title: 

दोन जणांना अशोकचक्र, तर ३ कीर्तिचक्र जाहीर

दोन जणांना अशोकचक्र, तर ३ कीर्तिचक्र जाहीर
Yes
No
Section: