मृत्यू पाहून आलेला माणूस, कोरोना झाल्यानंतर ६ महिन्यांनी तो असा परतला
दुबई : जगभरात गेली दोन वर्ष कोरोनाने थैमान घातलं आहे, कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. तर अनेकांनी कोरोनावर मातही केली. पण कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीने एक दोन नव्हे तर तब्बल सहा महिने मृत्यूशी लढा दिला आहे.
संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत फ्रंटलाईन वर्कर (Frontline Worker) असलेल्या एका ३८ वर्षीय भारतीयाने मृत्यूवर मात केली. तब्बल सहा महिन्यांनंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविड-19 ने या तरुणाच्या फुफ्फुसांना गंभीर इजा झाली होती आणि तो अनेक महिने बेशुद्ध होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर तो बरा होऊन घरी परतला आहे.
६ महिने मृत्यूशी झुंज
OT तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या अरुणकुमार एम नायर (Arunkumar M Nair) यांनी कृत्रिम फुफ्फुसाच्या (Artificial Lungs) सहाय्याने कोरोना विषाणूविरूद्ध सहा महिने लढा दिला. यादरम्यान त्यांना हृदयविकारासह अनेक शारिरीक समस्यांचा सामना करावा लागाल. पण अरुणकुमारची जगण्याची जिद्द आणि डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न यामुळे अरुणकुमार यांनी ही लढाई जिंकली. त्यांच्यावर ट्रेकीओस्टोमी आणि ब्रॉन्कोस्कोपी सारख्या अनेक वैद्यकीय प्रक्रिया देखील करण्यात आल्या.
५० लाखांची आर्थिक मदत
देशासाठी त्यांची सेवा आणि लढण्याची हिंमत पाहता बहुराष्ट्रीय आरोग्य सेवा समूह 'VPS हेल्थकेअर' ने अरुणकुमार यांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. हॉस्पिटलने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमिरातमधील त्याच्या सहकाऱ्यांनी अबुधाबीच्या बुर्जील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी झालेल्या एका समारंभात त्यांना मदतीची रक्कम सुपूर्द केली. इतकंच नाही तर रुग्णालयातर्फे त्यांच्या पत्नीला नोकरी दिली जाणार आहे तसंच त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार आहे.
अरुणकुमार केरळचे रहिवासी
अरुणकुमार हे केरळचे रहिवासी आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यामुळे त्यांना दुबईतल्या बुर्जील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल पाच महिने त्यांना आयसीयूमध्ये (ICU) लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं होतं.
अरुणकुमार यांची प्रतिक्रिया
रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर काय झालं हे काहीही आठवत नसल्याचं अरुणकुमार यांनी म्हटलं आहे. माझं कुटुंब, मित्र आणि इतर शेकडो लोकांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मी मृत्यू जबड्यातून परत आलो अशी प्रतिक्रिया अरुणकुमार यांनी दिली आहे.
अरुणकुमार बरं होणं हा एक चमत्कारच
बुर्जील हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. तारिग अली मोहम्मद अलहसन यांनी सांगितलं की, अरुणकुमार यांची प्रकृती पहिल्या दिवसापासूनच खराब होती. त्यांच्यावर सुरुवातीपासूनच डॉ.अलहसन यांनी उपचार केले. इतक्या गंभीर स्थितीतून बरं होऊन परतल्यानंतर डॉक्टर अलहसन यांनी हे एका चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं आहे
अरुणकुमार लवकरच आपल्या कुटुंबासोबत भारतात परतणार आहेत. तिथे त्यांना फिजिओथेरपी सुरु ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पुढच्या काही महिन्यात आपण पुन्हा दुबईत आपल्या नोकरीवर रुजु होतील असा विश्वास अरुणकुमार यांनी व्यक्त केला आहे.
मृत्यू पाहून आलेला माणूस, कोरोना झाल्यानंतर ६ महिन्यांनी तो असा परतला
