मंत्रिमंडळ विस्तारात सेनेलाही मंत्रीपद
मुंबई : राज्यातील पालिका निवडणुका आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला. त्यामुळे भापज ताळ्यावर आलेला दिसत आहे. बिहारमध्ये भाजपचा चांगलाच निकाल लागल्याने आता राज्यात याचे पडसात उमटू लागलेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिलेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजपने, राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेलाही दोन जागा देण्याची तयारी केली आहे. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे ही विरोधाची धार कमी करण्यासाठी भाजप सेनेला मंत्रिपदं देऊन खूश करण्याचे संकेत आहेत.
दिवाळीनिमित्त 'वर्षा' निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट संकेत दिलेत. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा दिल्लीचा दौरा केला होता. या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मिळाले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला.
बिहार विधानसभा आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेसोबत सरकारमध्ये काही अडचणी येतील, याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचे लोकार्पण १४ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री १७ नोव्हेंबरला भारतात परतणार आहेत. त्यानंतर फडणवीस मंत्रिमंडळात नियमानुसार ४३ सदस्य असू शकतात. सध्या मुख्यमंत्र्यांसह ३० मंत्री असून, १३ मंत्रिपदे रिक्त आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
मंत्रिमंडळ विस्तारात सेनेलाही मंत्रीपद
