ओसामाची बॉडी समुद्रात नाही अमेरिकेत
www.24taas.com, वॉशिंगटन
विकीलिक्सने स्ट्रॅटफोर इमेल्स प्रकाशित करत आणखी एक सनसनाटी गोप्यस्फोट केला आहे. अलकायदाचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेन याचा मृतदेह समुद्रात दफन करण्यात आला नव्हता असं या इमेलमध्ये नमुद करण्यात आलं आहे. स्ट्राटफोरचे फ्रेड बर्टन यांचे वक्तव्य इमेल्समध्ये नमुद करण्यात आलं आहे.
अमेरिकेच्या नेवी सिल्स यांनी पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये केलेल्या कारवाईत ओबामाचा खातमा झाला होता पण त्याचे दफन समुद्रात करण्यात आलं नाही तर त्याचा मृतदेह अमेरिकेला नेण्यात आला. बर्टन यांच्या म्हणण्यानुसार सीआयएच्या विमानाने ओसामाचा मृतदेह डोवरला (डेलावेअर) नेण्यात आला आणि तिथून पुढे मेरीलँडच्या आर्मड फोर्सेस इन्टिट्युट ऑफ पॅथोलॉजी इथे तपासणीसाठी पाठवण्यात आला.
बर्टन यांनी दुसऱ्या एका इमेलमध्ये याआधी अडोल्फ आइशमनच्या मृतदेहाची अशीच विल्हेवाट लावण्यात आली होती असं म्हटलं आहे. आइशमन नाझी मास्टरमाईंड होता आणि ज्युंच्या शिरकाण केल्याप्रकरणी त्याला इस्त्रायलने पकडल्यानंतर त्याच्या अस्तींचे विसर्जन समुद्रात करण्यात आलं होतं.
अमेरिकेने ओसामाचा मृतदेह अरेबियन समुद्रात पुरण्यात आल्याचं आणि इस्लामी धार्मिक परंपराचे पालन करण्यात आलं असं अमेरिकन सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं.
ओसामाची बॉडी समुद्रात नाही अमेरिकेत
