सैराटचा ऑफिशियल Review

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास)  'कुणाच्या बु़डाखाली किती अंधार आहे, हे समदं तालुक्याला माहित आहे. अहो तालुका संभाळायचं राहू द्या, आपल्या बायका आधी सांभाळा म्हणावं यांना', हा सैराटच्या प्रोमोमधील डायलॉग पर्शा-आर्चीच्या लव्हस्टोरीत खूप काही सांगून जातो.

राजकारणातील 'प्रतिष्ठा पणाला' म्हणजे काय असतं?

राजकारणात तुमची प्रतिष्ठा, तुमच्या नात्यातल्या जवळच्या महिलेवरून ठरवली जाते. राजकारणात महिलेवरून होणारे आरोप नेते जिव्हारी लावून घेतात, मग महिलेच्या चारित्र्यावरून होणारे आरोप पुसून टाकण्यासाठी, राजकारण अतिशय भयानक रूप दाखवतं. ते आधीच अवघड प्रेम आणि त्यात आडवं येणारं, भयानक रूप तुम्हाला सैराट सिनेमात दिेसेल.

गाणी पाहिली म्हणजे, सैराट पाहिला असं नाही...

सैराट सिनेमाची सुरूवातीला चर्चा झाली, ती गाणी आणि संगीतामुळे, पण सैराटची यापुढे चर्चा होणार आहे, ती सिनेमाच्या कहाणीवरून. सैराटची गाणी प्रेक्षकांचं मनं जिंकतायत. पण कहाणी मनात घर करणारी आहे.

सैराटच्या कहाणीचे अंदाज बांधा...

सैराटची गाणी आणि प्रोमो पाहिला म्हणजे तुम्हाला ९० टक्के, ९९ टक्के सिनेमाची स्क्रिप्ट समजली. नेमकं सिनेमात असं काही होणार आहे, असे अंदाज तुम्ही बांधले असतील तर ते अंदाज तुमचे किती जुळतात, हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला सैराट पाहावा लागेल.

गाणी पाहिली, पण कहाणी थक्क करणारी...

सैराटचा प्रोमो आणि गाण्यांमुळे खरोखरच सिनेमाचं प्रमोशन झालं, सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, प्रेक्षक सिनेमा-घरापर्यंत आला असं म्हणता येईल. मात्र सिनेमाची कहाणी फक्त तरूणांनाच नाही, तर दोन प्रेम करणाऱ्या मुलांच्या आई-वडीलांनाही खूप काही शिकवणारी आहे.

पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त....

सैराट पाहताना आधी असं वाटतं, लवकरच हा रोमँटिक सिनेमा संपेल, पण सुसाट वाहणारी सिनेमाची कहाणी नदीच्या पाण्यासारखी वळणावर थोडीशी थांबून एक जोरदार कलाटणी घेते, तेव्हा वाटतं पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त...

सैराट प्रेमाचे वेगवेगळे रंग

प्रेमात सैराट सुसाट पळणाऱ्यांना किती वेळा तोंडावर पडावं लागतं, गैरसमजातून प्रेमात एकमेकांचे पाय अडकल्यासारखं किती वेळेस तोंड फुटतं, तिचं घरात क्षणभर नसणं किती अंगावर येतं.

ग्रामीण भागातील बोलण्याचा लहेजा, त्यांची मैत्री, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी. आर्चीचं पाटलाच्या पोरीचं रांगडं रूप, पर्शाचं आर्चीला समजून घेणं, सांभाळून घेणं.. थोडक्यात सिनेमा पाहण्यासाठी नक्की जा, तुमचा वेळ सार्थकी लागेल.

सैराट यासाठी पाहा...

आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने साकारलेली पाटलाची एक धडाकेबाज मुलगी, पर्शा म्हणजे आकाश ठोसरचा, ठोसे खाऊ पण प्रेम करत राहू, हा अंदाज पाहण्यासाठी सैराट पाहा, आपण रोज जगत असतो, पण त्या जगण्यातले बारकावे आपल्या लक्षात येत नाहीत, हे बारकावे टीपण्याचं जे नागनाथ मुंजळे कौशल्य दाखवले त्यासाठी,  एवढंच नाही ग्रामीण लहेजा आणि प्रेम करणाऱ्या गरीब मित्राला दाखवलेली मदतीची श्रीमंती पाहण्यासाठी, प्रेमात-राजकारण-प्रतिष्ठा आमने-सामने आल्यानंतरचा संघर्ष अनुभवण्यासाठी, गरीबाची जातपंचायतीसमोरची मजबुरी काय असते, ते पाहण्यासाठी सैराट पाहा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
sairat - official review
News Source: 
Home Title: 

'सैराट'चा ऑफिशियल Review

सैराटचा ऑफिशियल Review
Yes
No