प्रकाश मेहता यांना दोषी धरता येणार नाही, चौकशी करु : मुख्यमंत्री
मुंबई : मोपलवारांपाठोपाठ मंत्री प्रकाश मेहतांच्या एसआरए प्रकरणाचं भूतही सरकारच्या मानगुटीवर बसलंय. प्रकाश मेहतांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मात्र मेहतांनी घेतलेला निर्णय रद्द केल्यामुळं त्यांना दोषी धरता येणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मात्र या प्रकरणाची चौकशी करणार असून दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलं. तर दुसरीकडे प्रकाश मेहतांवर कारवाई केल्याशिवाय विधानसभेचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिलाय.
तत्पूर्वी विरोधकांनी विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. खडसेंवर कारवाई केली मग मेहतांवर का नाही? असा सवाल अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केला. त्यावर खडसे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याचा दावा मुनगंटीवारांनी केला.
दरम्यान, विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांनी घातलेल्या बहिष्काराचा आज दुसऱ्या दिवशी मागे घेतला. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला आणि आज दुपारी दोन वाजता कामकाज सुरू झाला.
प्रकाश मेहता यांना दोषी धरता येणार नाही, चौकशी करु : मुख्यमंत्री
